बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:32 AM2024-03-01T10:32:51+5:302024-03-01T10:33:02+5:30

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता.

Names of BBA, BMS, BCA will be changed; Examination of option to circumvent AICTE norms | बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीबीए, बीएमएस आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या नाव बदलाला विद्यापीठाच्या विद्वत सभेत (अकॅडेमिक कौन्सिल) मान्यता घेऊन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निकषांना बगल देण्याचा विचार सुरू आहे.

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता. या संदर्भात मुंबईतील महाविद्यालय प्राचार्यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात विद्यापीठांच्या विद्वत सभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, असा विचार पुढे आला. एआयसीटीईचे नियम या अभ्यासक्रमांना लागू केल्यास महाविद्यालयांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही याबाबत मुंबई विद्यापीठाला पत्र लिहिले होते. तसेच, राज्य सरकारकडेही आपल्या अडचणी मांडल्या होत्या, अशी माहिती मुंबई महाविद्यालय प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष टी. ए. शिवारे यांनी सांगितले. विद्यापीठात १५५ महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. गेल्या वर्षी १४ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. 

स्वायत्त महाविद्यालयांच्या धर्तीवर नामबदल 
स्वायत्त महाविद्यालये नाव बदलून हे अभ्यासक्रम राबवित आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतूनही याच पद्धतीने नाव बदलून हे अभ्यासक्रम राबविले जातील, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 असा होणार नामबदल 
मूळ अभ्यासक्रम    प्रस्तावित नाव
बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)     बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) 
बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)     बीकॉम (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन)
बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए)     बीएस्सी (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)

हे अभ्यासक्रम शहराप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागातही लोकप्रिय आहेत. परंतु, त्यांना एआयसीटीई अंतर्गत आल्यास ते लवकरच बंद होतील. कारण अभ्यासक्रम राबविण्यासाठीचा खर्च वाढेल आणि विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणार नाही.
- टी. ए. शिवारे

Web Title: Names of BBA, BMS, BCA will be changed; Examination of option to circumvent AICTE norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.