पुढच्या वर्षी १२ जूनपासून शाळा सुरू होणार! शिक्षण विभागाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 07:35 AM2023-04-05T07:35:37+5:302023-04-05T07:35:57+5:30
शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबतही महत्त्वाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना २ मेपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
परीक्षेचा निकाल कधी?
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल ३० एप्रिलपर्यंत लागणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळांची आणि महाविद्यालयांची असणार आहे.
शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या
शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.
दहावी, बारावीचा निकालही वेळेतच
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तर दहावीचा निकाल त्यानंतर ८ ते १० दिवसांत जाहीर होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे.