‘गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा नको’; पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:17 AM2023-08-21T07:17:27+5:302023-08-21T07:18:21+5:30
येत्या १९ सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या १९ सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मात्र अनेक केंद्रीय शाळांच्या सहामाही परीक्षांचे आयोजन १८ सप्टेंबरपर्यंत केले आहे. गणेशोत्सवाच्या अगोदरच परीक्षा संपवण्याची मागणी पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
नवी मुंबईतील काही शाळांनी सहामाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. यामध्ये गणेशोत्सवाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षांचे नियोजन केले आहे. यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीला शनिवार आणि रविवार येत असल्याने अनेक पालकांनी दोन दिवस अगोदर गावी जायचे नियोजन केले आहे. मात्र या परीक्षा गणेशोत्सवाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत असल्याने गावी कसे जायचे, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. गणेशोत्सवाला सुट्टी न देणाऱ्या शाळांना या काळात पाच दिवसांची सुट्टी देऊन तोंडी किंवा लेखी अशा कोणत्याही स्वरूपाच्या परीक्षा घेऊ नयेत, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढावे, अशी मागणी विद्यार्थी व पालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात गणेशोत्सव काळात अनेक शाळांना गौरी गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट तसेच केंद्रीय मंडळाच्या शाळा या काळात हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात, त्यामुळे पालकांमध्ये नाराजी वातावरण आहे.