आता एकाचवेळी घ्या दोन पदव्या; दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:43 IST2025-02-24T09:42:01+5:302025-02-24T09:43:26+5:30
मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवीसाठी शुक्रवारी सामंजस्य करार झाला.

आता एकाचवेळी घ्या दोन पदव्या; दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने दुहेरी पदवीसाठी राज्यातील चार विद्यापीठांशी करार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांत पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. त्याचबरोबर एसएनडीटी विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी विद्यापीठासह अन्य नामांकित महाविद्यालयांबरोबरही दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबविण्यासाठी मुंबई विद्यापीठाची बोलणी सुरू आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील.
मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवीसाठी शुक्रवारी सामंजस्य करार झाला. त्यातून डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील. या करारान्वये डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र हे सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे.
करार प्रक्रिया सुरू
आता त्याच धर्तीवर अन्य विद्यापीठांबरोबर दुहेरी पदवीसाठी करार करण्याची प्रक्रिया मुंबई विद्यापीठाने सुरू केली आहे. सीओईपी विद्यापीठाशी करार अंतिम टप्प्यात आहे. अन्य विद्यापीठांशी बोलणी सुरू असून लवकरच प्रशासकीय बाबी पूर्ण करून करार केले जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोणते अभ्यासक्रम?
डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए. बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होऊ शकतील.
पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए, एम.कॉम (ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमससी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र) एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची दुहेरी पदवी विद्यार्थी घेऊ शकतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.