...आता परीक्षेपूर्वी झोप उडवणारे ‘स्टडी ड्रग्ज!’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:33 AM2022-01-05T07:33:56+5:302022-01-05T07:34:05+5:30

परीक्षेत जास्त मार्क्स मिळावेत, जास्त जागरणं करता यावीत, यासाठी विद्यार्थी चक्क ‘स्टडी ड्रग्ज’चा वापर करतात. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, एडिनबर्ग, नाॅटिंगहॅम, लंडन कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स आणि इतरही अनेक कॉलेजेसमध्ये यासंदर्भात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं.

... now 'study drugs!' taken by Students before exam, reports | ...आता परीक्षेपूर्वी झोप उडवणारे ‘स्टडी ड्रग्ज!’

...आता परीक्षेपूर्वी झोप उडवणारे ‘स्टडी ड्रग्ज!’

Next

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की, किमान वीस टक्के विद्यार्थी ‘स्टडी ड्रग्ज’चा वापर करून परीक्षा देतात. काय आहेत ही ‘स्टडी ड्रग्ज’? त्याचा काय फायदा होतो?- फायदा एकच, या ‘परीक्षा गोळ्या’ तुमची झोप उडवतात. रात्री भरपूर जागरण केलं तरी तुम्हाला झोप येत नाही आणि ‘फ्रेश’ वाटतं! त्यामुळं या ड्रग्जचा वापर ब्रिटनमध्ये दिवसेंदिवस वाढतो आहे. अर्थातच या ड्रग्जचे दुष्परिणामही मोठे आहेत. विद्यार्थ्यांना ते माहीत नाहीत, असं नाही; पण तात्कालिक ‘फायद्याकडं’ पाहून अनेक जण त्याकडं दुर्लक्ष करतात.

विद्यार्थी हुशार असो, नाहीतर सर्वसाधारण, परीक्षेचं प्रेशर सगळ्यांवरच असतं. परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत यासाठी प्रत्येकाचा आटापिटा सुरू असतो. कारण परीक्षेतील या मार्कांवरच विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळं भारतात तरी या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण पद्धतीत ‘बदल’ झाला; पण विद्यार्थी ‘परीक्षार्थी’च राहिला. एनकेनप्रकारेण परीक्षेत जास्त मार्क्स मिळवणं आणि नोकरीसाठी त्याचा उपयोग करणं हेच अनेक ‘गुणवंतांचं’ आजही ध्येय आहे. त्यामुळं परीक्षेच्या वेळी रात्र- रात्र जागरणं करणं, चहा-कॉफी पिऊन झोपेला मारणं, जागरणाची सवय करून जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणं... त्यामुळं आपला जास्त अभ्यास होईल आणि आपल्याला जास्त मार्क्स मिळतील, असा समज अजूनही कायम आहे. अर्थात, ‘ऐनवेळी’ जागं होणं आणि नंतर परीक्षेसाठी, अभ्यासासाठी रात्रीचा दिवस करणं हे सगळीकडंच आढळतं... 

परीक्षेचं आणि त्यात मिळणाऱ्या गुणांचं प्रस्थ आपल्याकडं जास्त असलं तरी जगभरातल्या अनेक देशात ते कमी नाही, हेही तितकंच खरं. ब्रिटनच्या अनेक नामांकित विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्येही मार्कांचं हे खूळ घुसलेलं आहे. ऑक्सफर्डसारखं विद्यापीठही त्याला अपवाद नाही. जितकी जास्त जागरणं, तितका जास्त अभ्यास आणि तितकं जास्त ‘ज्ञान’ आपल्या डोक्यात घुसणार, असं या विद्यार्थ्यांनाही वाटतं. त्यामुळं येथील विद्यार्थ्यांनी एक नवीनच शक्कल शोधून काढली आहे. 

परीक्षेत जास्त मार्क्स मिळावेत, जास्त जागरणं करता यावीत, यासाठी विद्यार्थी चक्क ‘स्टडी ड्रग्ज’चा वापर करतात. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, एडिनबर्ग, नाॅटिंगहॅम, लंडन कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स आणि इतरही अनेक कॉलेजेसमध्ये यासंदर्भात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २० टक्क्यांपेक्षाही जास्त मुलं ‘स्टडी ड्रग्ज’चा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या ड्रग्जचे विघातक परिणाम माहीत असूनही मेडिकल स्टोअर्समध्ये ते सर्रास मिळतात. अर्थात, बहुतांश विद्यार्थी या ड्रग्जसाठी इंटरनेटचा वापर करतात. तिथून ही ड्रग्ज मागवली जातात. तिथं तर कोणताही प्रतिबंध नाही. त्यामुळं अनेक तरुणांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. यातील अनेक ड्रग्ज जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस घेतल्यास ती प्राणघातक ठरू शकतात, असा सल्लाही डॉक्टर आणि तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, त्याकडं कोणीच गांभीर्यानं पाहत नाही, अशी स्थिती आहे. दोन पाउंड इतक्या कमी किमतीत ही ड्रग्ज कोणत्याही औषधाच्या दुकानात सहजपणे मिळू शकतात. काही औषध दुकानांत प्रिस्क्रिप्शन मागितलं जातंही, पण विद्यार्थ्यांकडं अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी लढवलेली शक्कल तर अतिशय अफलातून आहे. 

ही ड्रग्ज अगदी सहज आणि विनासायास ‘सगळ्यांना’ मिळावीत यासाठी काही विद्यार्थी  चक्क आजारपणाचं ढोंग करतात. डॉक्टरांकडून या ड्रग्जचे प्रिस्क्रिप्शन लिहून घेतात. एकदा का हे प्रिस्क्रिप्शन हातात आलं की, मेडिकल स्टोअर्समधून वारंवार ही ड्रग्ज घेतात आणि आपल्या दोस्तांनाही पुरवतात. ऑक्सफर्ड कॉलेजचे प्रोफेसर अँड्रेस सँडबर्ग यांनीही या माहितीला दुजोरा दिला. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शॉप्सवरून स्वत:साठी तर ही ड्रग्ज मागवतातच; पण अतिरिक्त खरेदी करून आपल्या मित्रांनाही पुरवतात. केम्ब्रिज कॉलेजच्या प्रोफेसर बार्बरा यांनी, तर आणखी धक्कादायक माहिती पुरवली. त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रग्जचं हे लोण आता अभ्यासिकांपर्यंत पोहोचलं आहे. 
‘अभ्यास’ करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन तिथंही अनधिकृत ‘दुकानं’ आणि पुरवठादार तयार झाले आहेत. अनेक विद्यार्थी हे ड्रग्ज थेट लायब्ररीतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘हातोहात’ पोहोचवतात. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ ब्रिटनच नव्हे, तर युरोपातील इतर अनेक देशांतही या ड्रग्जसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक नाही. ऑनलाइन खरेदी- विक्रीसाठी तर सगळ्यांना रानच मोकळं आहे. असे ड्रग्ज सर्रास उपलब्ध होणं म्हणजे देशाच्या आणि तरुणांच्या आरोग्याशी खेळणं आहे, यावर तातडीनं निर्बंध लादले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

विद्यार्थ्यांवर होणार कारवाई! 
ब्रिटनमधील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या कुलगुरूंच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे यापुढे ‘स्टडी ड्रग्ज’ घेऊन परीक्षा देणं परीक्षेतील गैरप्रकार मानला जाईल. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वं लागू केली जाणार आहेत. जे विद्यार्थी त्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: ... now 'study drugs!' taken by Students before exam, reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.