मुंबई विद्यापीठासाठी ६ लाखांहून अधिक प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:26 AM2023-06-16T10:26:08+5:302023-06-16T10:26:25+5:30
प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस देण्यात आली होती मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे, गुरुवारी सायंकाळी ही मुदतवाढ संपली. आतापर्यंत २ लाख ३३ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ६ लाख ५४ हजार २८ अर्ज विविध अभ्यासक्रमांसाठी सादर केले आहेत.
विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया २७ मे २०२३ पासून सुरू करण्यात आली होती. पहिली मेरिट लिस्ट १९ जूनला लागणार आहे. कोर्स, कॉलेज कोणतेही असले तरीही विद्यार्थ्यांना नोंदणी बंधनकारक आहे. यामधून दिला जाणारा नोंदणी क्रमांक नंतर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
- पहिली मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे २७ जून पर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी वेळ असणार आहे.
- २८ जूनला दुसरी मेरिट लिस्ट जारी होणार आहे. त्यानंतर ५ जुलैपर्यंत त्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
- तिसरी आणि अंतिम मेरिट लिस्ट ६ जुलैला जारी होणार आहे.