सवलतीच्या गुणांसाठी ५० नव्हे २५ रुपये भरा; विद्यार्थी-पालकांच्या विरोधानंतर मंडळाने केली कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:05 AM2022-12-14T06:05:05+5:302022-12-14T06:05:23+5:30
कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी, बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये कला, क्रीडाच्या सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क मंडळामार्फत आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला विविध क्रीडा संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड विरोध झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेऊन शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, तसेच खेळाडू, एन.सी.सी., स्काउट व गाईड प्रकाराच्या प्रस्तावांच्या छाननीसाठी आता प्रती विद्यार्थी ५० ऐवजी २५ रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. ही कार्यवाही मार्च-२०२३ च्या परीक्षेपासून अमलात आणावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केली आहे.
कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांनी यंदाही निकालाचा टक्का वाढविण्यास हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. मात्र, यावर्षीपासून विद्यार्थ्यांना या गुणांसाठी पैसे मोजावे लागणार असून प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक कला प्रकारासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला होता. दरम्यान, पालक आणि विद्यार्थ्यांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. शाळांनी छाननी शुल्क म्हणून प्रस्ताव स्विकारत असताना विभागीय मंडळाच्या नावे चलनाद्वारे किंवा रोखीने भरणा करून स्विकारावेत.
छाननी शुल्क कशासाठी?
कला, क्रीडा विषयातील अतिरिक्त गुणांसाठी खेळाडू विद्यार्थी मंडळाकडे प्रस्ताव दाखल करतात. या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो.
कला, क्रीडा प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जादाचे कर्मचारी विभागीय मंडळस्तरावर घ्यावे लागतात.
यासाठी वेळ, श्रम आदींचा विचार करता प्रतिविद्यार्थी २५ रुपये छाननी शुल्क आकारण्यात येणार आहे.