गरीब विद्यार्थ्यांनाही हाेता येणार ‘सीए’, स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:10 AM2022-06-05T09:10:57+5:302022-06-05T09:11:21+5:30
या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे.
मुंबई : सीए होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तसेच आर्थिकदृष्ट्याही हे शिक्षण परवडणारे नाही. परंतु, आता नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीए (सनदी लेखापाल) अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यामध्ये काही बदल प्रस्तावित आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमादरम्यान दिल्या जाणाऱ्या स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे.
आयपीसीसी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना आर्टिकलशीप करावी लागते. यादरम्यान एखाद्या प्रमाणित सीएच्या कार्यालयात काम करून अनुभव घ्यावा लागतो आणि यादरम्यान त्या विद्यार्थ्याला स्टायपेंड मिळतो. प्रस्तावित बदलानुसार सीएची परीक्षा विद्यार्थ्यांना आर्टिकलशीप झाल्यानंतर सहा महिन्यांनी देता येणार आहे. या सहा महिन्यांत विद्यार्थ्याला तयारी करावी लागणार आहे. स्वतःची प्रॅक्टिस करायची झाल्यास, त्याला तीन वर्षे आर्टिकलशीप करावी लागणार आहे. त्यानंतर एका वर्षाने परीक्षा देता येणार आहे. मात्र, कंपनीत सीए म्हणून नोकरी करायची झाल्यास, दोन वर्षे ‘आर्टिकलशीप’ ग्राह्य धरली जाणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थीही वळतील
विद्यार्थ्यांना आर्टिकलशीपदरम्यान मिळणारा स्टायपेंड कमी असल्याने उदरनिर्वाह आणि आर्थिक अडचणींचा प्रश्न उभा राहतो त्यामुळे स्टायपेंड वाढविण्याचा बदल या मसुद्यात प्रस्तावित आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीए अभ्यासक्रमाकडे वळता येईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.