वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 08:13 AM2023-06-18T08:13:34+5:302023-06-18T08:13:59+5:30

तक्रार दाखल करताना ‘मेंटल हेल्थ क्रायसिस’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे.

Pulled to the court for making bad habits! | वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

googlenewsNext

- मुक्ता चैतन्य 
(समाज माध्यम अभ्यासक)

अमेरिकेतल्या मेरीलँड व इतर काही राज्यांमधल्या शाळांनी मेटा, गुगल, स्नॅपचॅट आणि टिकटॉक या समाज माध्यम कंपन्यांना कोर्टात खेचले आहे. कारण एकच, या कंपन्यांनी निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म्समुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. हॉवर्ड कंट्री पब्लिक स्कूल सिस्टीमच्या वतीने हा दावा ठोकण्यात आला आहे. तक्रार दाखल करताना ‘मेंटल हेल्थ क्रायसिस’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे.

गेल्या दहा-बारा वर्षात आपले हातपाय पसरत समाज माध्यमे सर्वसामान्य माणसांच्या आणि विशेषतः मुलांच्या आयुष्यात झपाट्याने शिरली आहेत. ज्याचे मनोसामाजिक परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले आहेत. ही माध्यमे चांगल्या गोष्टींसाठी वापरता येऊ शकतात हे कितीही खरं असलं तरी तारुण्यात पदार्पण करणाऱ्या सगळ्याच मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये माध्यम शिक्षित होण्याची निकड असेलच असं नाही. गरज लक्षात आली तरी त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते केले जातीलच असंही नाही. अशावेळी या माध्यमांची उपयुक्तता कितीही असली तरी त्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते फार गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणूनच अमेरिकेतल्या शाळांनी मानसिक आरोग्याचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निर्माण करण्याच्या कारणावरून या कंपन्यांना कोर्टात खेचलं आहे. 

खरंतर ही सगळीच माध्यमं आपण बारकाईने बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल यात असलेली सगळी फीचर्स ही वापरणाऱ्याने पुन्हा पुन्हा इथे यावे यासाठीच तयार केलेली आहेत. एखाद्या गेमसारखी. गेमिंगमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे ‘ट्रिगर्स’ जाणीवपूर्वक टाकलेले असतात, जेणेकरून खेळणारा परत परत आला पाहिजे, तसाच काहीसा प्रकार समाज माध्यमांच्या बाबतीतही आहे. मुळात हे सगळे व्यवसाय आहेत हे लक्षात घेऊ या. इथे फुकट आणि वाटेल त्या पद्धतीने व्यक्त होण्याची मुभा असली तरी चालवणाऱ्यांसाठी हा व्यवसाय आहे. साधं उदाहरण घेऊ. जर एखाद्या दुकानात आपण खरेदीसाठी गेलो आणि परत कधीच गेलो नाही तर ते दुकान चालेल का? नाही चालणार! तोच प्रकार इथेही आहे. आपण एकदा सोशल मीडियावर गेलो आणि परत गेलोच नाही तर त्यांचा व्यवसाय होणार कसा? याचाच अर्थ आपण परत परत तिथे जात राहणं, आपण या माध्यमांवर अवलंबून राहणं, आपल्याला त्यांची तीव्र मानसिक गरज भासत राहणं आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागून या माध्यमांचा धंदा तेजीत चालण्यासाठी आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच या माध्यमाची रचना केलेली आहे. 

गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून हे आता स्पष्ट झालेलं आहे की समाज माध्यमांचा माणसांच्या मानसिकतेवर, भावनिकतेवर परिणाम होतो. हे परिणाम होतात कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे अल्गोरिदम अधिकाधिक वैयक्तिक होत चालले आहेत. आपल्या डिजिटल प्रोफाईलवरून आपल्याला काय आवडेल, आपण काय बघू-वाचू-ऐकू-शोधू याचे निर्णय माध्यमे घेऊ लागली आहेत. ही सगळी यंत्रणा विकसित झाली आहे ती मुळात समाज माध्यमाच्या आर्थिक उत्पन्नासाठी. त्यामुळे ही माध्यमं फक्त अभिव्यक्तीची आहेत असा कुणीही भ्रम करून घेऊ नये. समाज माध्यमावर जाहिरातींची एक प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे टार्गेट ग्राहक आहे मुलं, टीनएजर आणि यंग ॲडल्टस म्हणजे वय वर्ष ८ ते ३०. हाच वयोगट त्यांचा आताचाही ग्राहक आणि आणि भविष्यात दीर्घकाळ टिकून राहणाराही ग्राहक आहे. त्यामुळे या ग्राहकाच्या माध्यम सवयी विकसित करणं हे या कंपन्यांच्या अजेंड्यावरचं एक महत्त्वाचं काम असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. या माध्यम सवयी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तयार होत जातात आणि या प्रक्रियेत ‘डिजिटल माध्यम शिक्षण’ आणि ‘डिजिटल विस्डम’ किंवा डिजिटल जगात वावरण्याचा शहाणपणा/समंजसपणा हे दोन मुद्दे पूर्णपणे मागे पडतात, पडले आहेत.

ज्यामुळे लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांमध्ये विविध प्रकारचे मनोसामाजिक परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे. 
यातली सगळ्यात मोठी गोची म्हणजे प्रत्यक्ष वास्तवापासून ‘युझर्स’ झपाट्याने दूर जायला लागतात. ज्याला जमिनी वास्तव (ग्राउंड रिएलिटी) म्हणतात त्यापासून आपण फारकत घेतो. आपल्या मनातल्या कल्पना, आपल्या भावना, विचार, आपला आभास आणि आपल्याकडे असलेली माहिती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपाने आपल्यापर्यंत पोचते आणि आभासी जगातलं हे ‘दाखवू केलेलं सत्य’ प्रत्यक्ष जगातलं अंतिम सत्य मानण्याची आपली मानसिकता होते. हॉवर्ड कंट्री पब्लिक स्कूल सिस्टीमने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची जबाबदारी आज ना उद्या उचलणं अपेक्षित आहे. या खटल्याचे काय होईल ते लवकर समजेलच, पण तोवर आपल्या मुलांना, तरुणाईला आणि विविध गटातल्या माणसांना माध्यम शिक्षणाकडे कसं नेता येईल याचा विचार आवश्यक आहे. डिजिटल माध्यम शिक्षण आता आपण ऑप्शनला टाकू शकत नाही. 
 

Web Title: Pulled to the court for making bad habits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.