बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड झाले गायब, समोर आला नवा गोंधळ

By सीमा महांगडे | Published: June 16, 2023 10:33 AM2023-06-16T10:33:37+5:302023-06-16T10:33:59+5:30

क्यूआर कोड नसल्याने शिक्षक संभ्रमात, तंत्रस्नेही उद्देशावर विरजण?

QR codes disappeared from Balbharti's book, a new confusion came to light | बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड झाले गायब, समोर आला नवा गोंधळ

बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड झाले गायब, समोर आला नवा गोंधळ

googlenewsNext

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बालभारतीच्या पुस्तकांना तंत्रज्ञानाची साथ मिळावी, विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक रंजक करता यावे यासाठी २०१६ पासून पुस्तकांमध्ये धडा आणि कवितेच्या खाली क्यूआर कोड देण्यात आला. या क्यूआर कोडच्या सहाय्याने मुलांसाठी विविध विषयांचा इंटरनेटवरील खजिना वर्गखोल्यांमध्ये उपलब्ध झाला. मात्र, यंदा बालभारतीच्या नव्याने आलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकात हा क्यूआर कोड गायब झाल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. विद्यार्थी, शिक्षकांना तंत्रस्नेही करण्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेला क्यूआर कोड पुस्तकांमधून अचानक काढून टाकण्याचा शिक्षण विभागाचा नेमका उद्देश काय? मुलांना तंत्रस्नेही करण्याचा यापेक्षा चांगला पर्याय बालभारतीकडे आहे का, असा सवाल शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करीत आहेत.

पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जावे आणि मोबाइल फोनच्या माध्यमांतून पालक- शिक्षक- विद्यार्थी हे नाते अधिक विकसित व्हावे, या हेतूने क्यूआर कोडचा प्रयोग विकसित करण्यात आला होता. तर क्यूआर कोड वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. प्रत्येक वर्गाच्या अभ्यासक्रमाचा डिजिटल कन्टेन्ट शिक्षकांमार्फत बनवून तो क्यूआर कोडमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याने हे शिक्षण अधिक रंजक होत होते. शिवाय कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही क्यूआर कोडेड पुस्तकांमुळे लाखो मुलांना शिक्षण घेणे सुलभ झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणलेल्या एकात्मिक पुस्तकांमधून हा क्यूआर कोडच काढून टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुस्तकात प्रत्येक धड्यामागे एक कोरे पान नोंदीसाठी देण्यात आले आहे.

म्हणे क्यू आर कोडचा फार वापर नाही

बालभारतीची यंदाची एकात्मिक क्रमिक पुस्तके हे नव्या स्वरुपातील आहेत शिवाय क्यू आर कोड चा आतापर्यंतचा विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून होणारा वापर ही फारसा नसल्याचे लक्षात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन डिजिटल कन्टेन्ट तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. शिवाय विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाढलेला वापर लक्षात घेता, शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद, त्यातून होणार अभ्यास महत्त्वाचा असल्याने क्यूआर कोड यात समाविष्ट नाही 
- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

एक पाऊल पुढे की मागे?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना स्मार्टफोन व इंटरनेटचे ज्ञान आजच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचे आहे. त्याच साधनांचा वापर त्यांनी शिकण्यासाठी करावा या उद्देशाने पुस्तकात अनेक नवे भाग समाविष्ट होत असतात. ती अधिक माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असते.  केवळ लिखित स्वरूपातून नाही तर दृकश्राव्य माध्यमातूनदेखील बरीच माहिती मिळेल व पर्यायाने शिकणे सोपे होत असल्याच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत. पुस्तकांमध्ये जिथे वह्यांची पाने शिक्षण विभाग देत आहे, तेथे अधिकच्या माहितीसाठी, ज्ञानासाठी शिक्षकांनी तयार केलेले कन्टेन्ट  क्यूआर कोडच्या माध्यमातून देणे अपेक्षित होते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  

पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडमुळे ती मोबाइलधार्जिण्या पिढीला अधिक मनोरंजक झाली होती. मुले पाठानुसार बरीच अवांतर माहिती क्यूआर कोडच्या सहाय्याने वाचू शकत होती. नव्या पाठ्यपुस्तकांचा चेहरा व अंतरंग बदलताना क्यूआर कोड काढून टाकण्यामध्ये क्यूआर कोडची का अडचण झाली हे अनाकलनीय व विद्यार्थ्यांचा हिरमोड करणारे आहे. -जयवंत कुलकर्णी, शिक्षक व समुपदेशक

Web Title: QR codes disappeared from Balbharti's book, a new confusion came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.