रणजी क्रिकेट सोडलं अन् 'त्याने' UPSC ची तयारी केली; विना कोचिंग पटकावलं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:33 AM2023-05-26T10:33:17+5:302023-05-26T10:34:14+5:30
मनोज सध्या समाजशास्त्रात MA करत आहे. त्याने गावातील शाळेतून १० वी पूर्ण केली, त्यानंतर त्याने १२ वी सीकरमधून केली
सीकर - यूपीएससी परीक्षेचे निकाल लागले असून त्यात राजस्थानच्या सीकर येथील मनोज मेहरिया याने देशात ६२४ वा रँक प्राप्त करत यश मिळवले आहे. मनोजच्या या कामगिरीने गावाचे नावलौकिक झाले. मनोजचे वडील राजेंद्र मेहरिया यांचे निधन झाले असून ३ भावंडांमध्ये मोठे असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मनोजच्या खांद्यावर आली. मनोजचा निकाल ऐकून आई तारादेवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
दिवंगत वडिलांचे स्वप्न मुलाने पूर्ण केल्यामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मनोजच्या घरात उत्साहाचे वातावरण आहे. मनोजने सांगितले की, मी कोणत्याही कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतले नाही आणि स्वतः घरी अभ्यास करून हे यश मिळवले आहे. मनोजच्या घवघवीत यशाची बातमी मिळताच शहरवासीयांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. या शूभवार्ताने गावात गावकऱ्यांनी मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांचे तोंड गोड करत कौतुक केले.
मनोज सध्या समाजशास्त्रात MA करत आहे. त्याने गावातील शाळेतून १० वी पूर्ण केली, त्यानंतर त्याने १२ वी सीकरमधून केली. बारावीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मनोज हा रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. दुखापतीमुळे २०१८ मध्ये क्रिकेट सोडले आणि पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळला. यानंतर त्याने अनेक सरकारी भरती परीक्षा उत्तीर्ण केल्या पण चांगली नोकरी मिळविण्याची तयारी सुरूच ठेवली. लॉकडाऊनच्या वेळी UPSC ची तयारी सुरू केली.
मनोजला कोचिंगमध्ये आरामात अभ्यास करता येत नव्हता, म्हणून त्याने स्वतः अभ्यास केला. सध्या त्याने चांगली रँक घेऊन UPSC उत्तीर्ण केले आहे, पण स्वप्न IAS होण्याचे आहे, त्यामुळे तो २०२३ मध्ये परीक्षाही देणार आहे. स्पर्धा परिक्षांच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना मनोज म्हणाला की, तुम्हाला कुठूनही मिळत असलेल्या माहितीचा वापर करू नका. तुमचे सोर्स मर्यादित ठेवा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. तयारी दरम्यान, नातेवाईक आणि लग्नाला उपस्थित राहणे सोडावे लागतात, परंतु निवडीसाठी एवढी किंमत मोजावी लागते.