शेळ्यांना चरायला नेणाऱ्या मुलीनं काढलं गावाचं नाव, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:41 PM2022-06-08T18:41:26+5:302022-06-08T18:42:09+5:30
महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे.
नारायणपूर-
महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. कला शाखेतून ९३ टक्के गुणांसह रवीना गुर्जर नारायणपूर मधून टॉपर ठरली आहे. रवीनानं गावातीलच एका उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलं आहे.
रवीना नेहमीप्रमाणे तिचं दैनंदिन काम करत होती आणि शिक्षक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. बारावीच्या निकालात आपण पहिलं आल्याचं कळल्यानंतर रवीनाला खूप आनंद झाला. नारायणपूरातून टॉप केल्याच्या बातमीवरही तिचा विश्वास बसत नव्हता. रवीनाच्या कुटुंबीयांच्या आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची आहे. रवीनानं तिच्या बालपणीच आपल्या वडिलांना गमावलं होतं. तर आई विद्या देवी यांची प्रकृती ठीक नसते. तिच्या आईचं तीन वर्षांपूर्वी किडनीची शस्त्रक्रिया झाली आहे. रवीनाला दोन भाऊ देखील आहेत. घरची हलाकीची परिस्थिती असतानाही रवीनानं तिचं शिक्षण सुरू ठेवलं. रवीना शेळ्यांना गवत चरायला नेण्याचं काम करायची आणि आपल्या आईलाही घरकामात मदत करायची.
रवीनानं १२ वीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर तिच्या आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. नातीच्या मेहनतीचं फळं तिला मिळालं अशा शब्दांत आजीनं आपल्या नातीचं तोंडभरुन कौतुक केलं आणि तिला आशीर्वाद दिला. रवीनाला दोन भाऊ आहेत. एक मोठा आणि दुसऱ्या भावानं इयत्ता १० वीची परीक्षा दिली आहे. रवीना गुर्जर हिला पोलीस सेवेत भर्ती होऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे.