रोबोट ‘कुत्रा’ विरुध्द रोबोट ‘खेचर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:33 IST2025-01-23T09:32:49+5:302025-01-23T09:33:35+5:30
Technology: नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे.

रोबोट ‘कुत्रा’ विरुध्द रोबोट ‘खेचर’!
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत चीननं आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला होता, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यामुळे भारतानंही एक मोठा धडा घेतला आणि चीनपासून कायम सावधच राहायला हवं ही शिकवण आपल्याला मिळाली. नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे.
चीननं भारताच्या सीमेवर अलीकडेच रोबोटिक डॉग स्कॉड तैनात केला आहे. चीननं आपल्या सैन्यात या रोबोटिक डॉग्जची ‘भरती’ केली आहे. त्याचे काही व्हिडीओही मध्यंतरी व्हायरल झाले होते. त्यापासून सावध होत आणि त्या दिशेनं पावलं उचलत भारतानंही आता भारत-चीन सीमेवर ‘रोबोटिक आर्मी’ तैनात केली आहे. अर्थात, ही रोबोटिक आर्मी प्रत्यक्ष लढाईवर जाणार नसली तरी सैनिकांना त्यांची फार मदत होणार आहे. भारत-चीन सीमेवरील प्रदेश अत्यंत बर्फाळ, दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. कोणतीही वाहनं इथे चालू शकत नाही. त्यामुळे अशा उंचीवर आणि कडाक्याच्या थंडीत सर्व सामानही सैनिकांनाच आपल्या खांद्यावर, पाठीवर वाहून न्यावं लागतं किंवा त्यासाठी प्राण्यांचा वापर करावा लागतो, पण बऱ्याचदा या प्राण्यांचीही अशा ठिकाणी मर्यादा असते. त्यावर मात करण्यासाठी आणि उत्तर शोधण्यासाठी भारतानं ‘रोबोटिक आर्मी’ तयार केली आहे. विशेषत: सामान वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. ही रोबोटिक आर्मी म्हणजे रोबोटिक म्यूल्स- मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट्स आहेत. एका वेळी १५ ते ३० किलो वजन घेऊन हे रोबोट्स दहा फुटांपर्यंतचा उभा चढ अगदी सहजतेनं चढू शकतात. उणे ४० अंश तापमानातही ते क्रियाशील राहू शकतात. रिमोटच्या साहाय्यानंही त्यांना ऑपरेट करता येऊ शकतं. येत्या पाच वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत सामान वाहतुकीचं सुमारे ७० टक्के काम या आर्मीकडे सोपवलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. आपल्याप्रमाणे तंत्रज्ञान कोणालाच बनवता येणार नाही, असं चीनला वाटत होतं, पण भारतानं अल्पावधीत ही ‘रोबोटिक आर्मी’ तयार केल्यानं चीनही आश्चर्यचकित झाला आहे.
सध्या भारताकडे अशा ७० रोबोटिक म्यूल्सची आर्मी आहे. म्युल म्हणजे खेचर! हळूहळू या आर्मीची भरती वाढवण्यात येईल. उत्तरेला चीन सीमेलगत ही आर्मी तैनात करण्यात आली असून त्यांनी आपलं कामही सुरू केलं आहे. भारतीय रोबोटिक म्यूल्स आर्मी दिसायला ‘रोबोटिक डॉग’सारखीच आहे. ७७व्या राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त पहिल्यांदा ही रोबोटिक आर्मी सीमेवर पाहायला मिळाली होती. भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना या आर्मीनं सलामीही दिली. द्विवेदी म्हणाले होते, अत्यंत दुर्गम अशा भारत-चीन सीमेवरील लष्कराच्या अडचणी कमी करण्यासाठी खास या आर्मीची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काळात भारतीय लष्कराच्या मदतीला यापेक्षाही आधुनिक आणि लष्कराचं प्रत्यक्ष काम करू शकतील अशा ‘ताज्या दमाच्या’ रोबोट्सची भरती केली जाणार आहे.