पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:28 AM2021-07-24T05:28:19+5:302021-07-24T05:29:14+5:30
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीचा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम मागील वर्षाप्रमाणेच २५ टक्के कमी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
१५ जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणारा ताण याचा विचार करता शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांच्यामार्फत हा निर्णय जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण निश्चित करावे
याआधी सेतू अभ्यासक्रमामुळे ४५ दिवस आणि त्याआधीचे १५ दिवस याप्रमाणे शैक्षणिक कामकाजातील ६० दिवस कमी झाल्याने अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे, याबाबत शिक्षण विभागाकडून आराखडा किंवा नियोजन मार्गदर्शक सूचनांची मागणी केंगार यांनी केली आहे. आयसीएसईप्रमाणे मूल्यमापनाचे धोरण निश्चित करावे म्हणजे शिक्षक मुख्याध्यापक यांना मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विषय तज्ज्ञांचा समावेश करावा
- शाळा, महाविद्यालये बंद ठेवल्याने शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून सातत्याने अभ्यासक्रम कपातीची मागणी होत होती. त्यानंतर केवळ २५% अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. अजूनही कोरोना संसर्ग कमी झाला नसल्याने शाळा कधी सुरू होणार याबाबतीत अनिश्चितता आहे.
- उपलब्ध कालावधीचा विचार करून अभ्यासक्रम ४०% इतका कमी करावा लागल्यास त्याची तयारी ठेवावी, अशी विनंती मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे. कपातीमध्ये संभ्रम वा संदिग्धता राहू नये यासाठी निर्णयात त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग करावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेच्या पांडुरंग केंगार यांनी केली आहे.