Schools Reopening : वर्ग भरविणे बंधनकारक, मात्र विद्यार्थ्यांना उपस्थिती ऐच्छिक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:36 AM2021-12-12T05:36:11+5:302021-12-12T05:36:32+5:30
पालिका शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सूचना, विद्यार्थ्यांसाठी पालकांचं संमतीपत्र आवश्यक.
मुंबई : येत्या १५ डिसेंबरपासून मुंबईतशाळा सुरू करण्याची तयारी पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात येत असून, शाळांना अतिरिक्त सूचना पालिका शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. पालिका शिक्षण विभागाकडून निर्देशित केल्याप्रमाणे मुंबईतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उपस्थित राहणे ऐच्छिक असले, तरी शाळांना मात्र सोमवार ते शनिवार सर्व दिवस वर्ग भरविणे बंधनकारक असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार पालिका शिक्षण विभागाने शाळांना कोविड १९ सुरक्षिततेच्या सूचनांसोबतच आणखी काही अतिरिक्त सूचनाही दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्रही बंधनकारक असणार आहे.
पहिली ते सातवी किंवा आठवी ते बारावीमधील वर्ग हे ऑफलाईन असले तरी ते ३ ते ४ तासांपेक्षा अधिक वेळ असू नये, हेही अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतूक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी काळजी घ्यावी, असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी स्पष्ट केले.