School Reopening: ८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:25 AM2021-10-05T07:25:23+5:302021-10-05T07:26:29+5:30
शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : सोमवारपासून राज्यातील शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी शाळा सुरू झाल्या आहेत. या शिक्षणोत्सवाच्या पहिल्या दिवशीच रात्री ९ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २० जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून ८३ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत तर ४७ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रात्री ९ पर्यंतच्या माहितीमध्ये राज्यातील आणखी काही जिल्ह्यांची माहिती येणे अपेक्षित असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बऱ्याच कालावधीनंतर शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील २० जिल्ह्यातील शाळांच्या माहितीनुसार ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण ३२ हजार १३ शाळा आहेत, त्यापैकी २६ हजार ६९४ शाळा सोमवारी सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून ५४ लाख १५ हजार १३६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी सोमवारी २५ लाख ३७ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती दर्शविल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला असून विविध पद्धतींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. याचे तंतोतत पालन शाळांमध्ये झाल्याचे दिसून आले.