School Reopening: आजपासून शाळांमध्ये शिक्षणोत्सव; विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:48 AM2021-10-04T05:48:05+5:302021-10-04T05:50:57+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला
मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळांमधील किलबिलाट सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईतील शाळांमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा मोबाइलऐवजी प्रत्यक्ष वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे धडे घेणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करावा, जेणेकरून मनावरील ताण, भीती कमी
होईल अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. तेव्हापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी हे प्रत्यक्ष शाळांपासून दुरावले आहेत. पण याआधी जेथे कोरोना रुग्णसंख्या कमी होती त्या जिल्ह्यांत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईत तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, तर पालकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे शनिवारी अनेक शाळांमध्ये पालक, शिक्षक यांच्यात बैठक झाली. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी पालक, शाळा व्यवस्थापनामध्ये अनेक मुद्द्यांवरून संभ्रम आहेत. मात्र पुढील काही काळात त्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून व्यक्त होत आहे.