तब्बल दीड वर्षांनंतर शाळा पुन्हा उघडणार; गुजरात, दिल्लीत टप्प्याटप्प्याने सुरू हाेणार वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:37 AM2021-08-28T05:37:35+5:302021-08-28T05:38:27+5:30
दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद: कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षांनी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठाेपाठ दिल्ली आणि पुडुच्चेरी सरकारने राज्यातील शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत. दिल्लीमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या आटाेक्यात आल्यानंतर सरकारने शाळांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक केलेले नाही. प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांनी सांगितले.
पुडुच्चेरी सरकारनेही सप्टेंबरमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जवाहर नवाेदय विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गणेशाेत्सवात निर्बंध लावण्याचा केंद्राचा सल्ला
नवी दिल्ली: महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच दहीहंडी व गणेशाेत्सव हे सण जवळ आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेणे आवश्यक असून स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्याचा सल्ला केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने राज्याला दिला. केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला याबाबत पत्र पाठविले आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या व चाचण्यांमध्ये पाॅझिटीव्हीटीचा दर वाढत असल्याचा उल्लेख यात पत्रात केला आहे. तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी इशारा दिलेला असताना संसर्ग वाढेल असे सुपर स्प्रेडर कार्यक्रम टाळण्याच्या सूचनाही या पत्रातून दिला आहे.