गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच! विद्यार्थी संघटनांची मागणी; शाळांनी परीक्षा न घेण्याचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:45 AM2022-08-26T05:45:24+5:302022-08-26T05:45:48+5:30
दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
मुंबई :
दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणत्याही परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये अशाप्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
मुंबईतील उपसंचालक विभागाकडे यासंदर्भातील अनेक निवेदने आल्याने मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांनी तत्काळ सर्व शाळांना उत्सवकाळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक-विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील आपल्या गावी जात असतात. मात्र, या दरम्यान कॉन्व्हेन्ट शाळा जाणूनबुजून शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते, परंतु परतीच्या प्रवासाला गर्दी होत असल्यामुळे तातडीने परतणे शक्य होत नाही. त्यामुळे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत, असे निवेदन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ देवरुखकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना दिले. यावर कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनीही दिले आहे.
अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकला
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर सुरू करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीकडून शिक्षण संचालकांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड १ चे प्रवेश दिनांक ३० ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्ण करावेत, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा स्पेशल राऊंड गणेशोत्सवानंतर होणे आवश्यक आहे, असे सुभाष मोरे यांनी सांगितले.