सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 12:10 PM2023-06-16T12:10:52+5:302023-06-16T12:12:44+5:30

दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुराढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत.

Shirpur in Dhule district has 14 schools which has no concrete structure | सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत

सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत

googlenewsNext

सुनील साळुंखे

लोकमत न्यूज नेटवर्क, शिरपूर: खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांनीही कात टाकलेली आहे; मात्र दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाही पक्की तर टिनाचीही खोली नशिबात नाही. शिरपूर तालुक्यातील तब्बल १४ पाड्यांवरील जि.प.च्या शाळा या चक्क झोपडीत भरतात. हे पाडे अभयारण्य क्षेत्रात येतात. त्यामुळे तेथे बांधकामाची परवानगी मिळत नसल्याने, या शाळा झोपडीत भरतात, असे सांगण्यात आले; मात्र शाळेशेजारीच बांधली जाणारी गुरे, त्यांचा कुबट वास अशा वातावरणात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात.

कौपाटपाडा येथे गावाने गावठाणची १८५ चौ.मी. जागा शाळेसाठी मंजूर केली आहे; मात्र हा पाडा अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे येथे बांधकामास मंजुरी मिळत नाही. दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुराढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत. पाण्याची पुरेशी सोय नाही. खिचडी शिजविण्याची जागा नाही. इतर ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रसन्न वातावरणाची अनुभूती येते; मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या दुर्गम भागातील पाड्यांवरील या शाळांचे नशीब कधी बदलणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सातपुड्यातील पाडे सुविधांपासून वंचित

  • शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या रांगेत असलेल्या खुटमळी, टिटवापाणी, पीरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा-सावेर, पिपल्यापाणी-रोहिणी, चिंचपाणी-महादेव दोंदवाडे या ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या ६ पाडे पक्षीय अभयारण्य क्षेत्रात येतात. 
  • हे पाडे भौतिक सुविधांपासून वंचित आहेत. गेल्या १० वर्षांपासून येथे जिल्हा परिषदेच्या शाळा  सुरू आहेत. वर्गखोल्या बांधकामास परवानगी मिळत नसल्यामुळे काही वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधीदेखील परत गेला आहे. येथील शाळा आजही कुडाच्या झोपडीत वा उघड्यावर भरत आहेत़.


पक्क्या वर्गखोल्या कधी?

  • २०१२ मध्ये या १४ शाळा सुरू करण्यात आल्या. मालपूरपाडा, प्रधानदेवी, शेकड्यापाडा, भूपेशनगर, न्यू सातपाणी, कौपाटपाडा, सातपाणी, सोज्यापाडा, रूपसिंगपाडा, सुभानपाडा, मेंढाबर्डी, गुहाडपाडा, खडरागडपाडा, उगबुड्यापाडा येथील या शाळाही झोपडीत भरत आहेत़.


शिक्षक नसल्याने शाळा पाडली बंद

  • आदर्की (जि. सातारा) : जिल्हा परिषदेच्या घाडगेवाडी शाळेतील शिक्षकांची बदली सहा महिन्यापूर्वी केली. परंतु, त्यांच्या जागी नवीन शिक्षकाची नेमणूक झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेत शाळा बंद ठेवली.
  • निलंगा (जि. लातूर) : अनसरवाडा येथील ५० विद्यार्थ्यांची केवळ बस न आल्यामुळे शाळा पहिल्याच दिवशी बुडाली. यामुळे पालक व पाल्यांनी एसटी महामंडळाविरुद्ध असंतोष व्यक्त केला.


पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

  • सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील खैरखेडा येथील जि. प. प्राथमिक शाळेत अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याविरोधात पालकांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकत रोष व्यक्त केला. खैरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ६६ आहे; परंतु या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे. गतवर्षी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यावर्षीदेखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पालकांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेत शाळेला कुलूप ठोकले.
  • केडगाव (जि. अहमदनगर): नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील प्राथमिक शाळेवर गेली दोन-तीन वर्षे संचमान्यतेनुसार पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होत शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी शाळा सुरू होऊ दिली. याविषयी गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे अनेक वेळा निवेदन दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 

Web Title: Shirpur in Dhule district has 14 schools which has no concrete structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा