मुलांसाठी ‘एज्युकेशन लोन’ घ्यावं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:18 AM2021-08-10T05:18:33+5:302021-08-10T05:19:28+5:30

पालक सांगतात, मुलाला मोठ्या शहरात, अमुकच कॉलेजात, तमुकच राज्यात, ढमुकच देशात ॲडमिशन हवी आहे. फी फार आहे. पण, आपल्या परिस्थितीमुळे मुलांची संधी जाऊ नये.

Should I take an education loan for children? | मुलांसाठी ‘एज्युकेशन लोन’ घ्यावं का?

मुलांसाठी ‘एज्युकेशन लोन’ घ्यावं का?

googlenewsNext

- पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार

ॲडमिशन्सचा हंगाम सुरू झाला की पालक एक प्रश्न हमखास विचारतात, एज्युकेशन लोन घ्यावं का मुलांसाठी? 

हा प्रश्न एकटाच नसतो, त्यामागे मोठी भावुक मन:स्थिती असते. पालकांना वाटतं, मुलांचं उच्चशिक्षण पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी पैसा कमी पडायला नको. त्यामुळे मला कुणीही हा प्रश्न विचारला की मी उत्तर देतो, ‘इट डिपेंण्ड्स.’ 

पालक सांगतात, मुलाला मोठ्या शहरात, अमुकच कॉलेजात, तमुकच राज्यात, ढमुकच देशात ॲडमिशन हवी आहे. फी फार आहे. पण, आपल्या परिस्थितीमुळे मुलांची संधी जाऊ नये. त्यामुळे मी म्हणतो की, इट डिपेंण्ड्स. तुमचं वार्षिक उत्पन्न १० कोटी असेल आणि मूल  शिक्षणासाठी ५० लाख मागत असेल तर देऊन टाका, जास्त विचार करायची गरज नाही. पण, तसं नसेल तर मुलांना घेऊ द्या एज्युकेशन लोन, ते मिळावं म्हणून नक्की मदत करा. त्यांची संधी, स्वप्नं महत्त्वाचीच आहेत, पण आर्थिक गांभीर्य आणि स्वावलंबन, आर्थिक जबाबदारी घेणं शिकणं हे मुलांनीही शिकायला हवं. मुलांना एज्युकेशन लोन घेऊ देताना किंवा स्वत: तो खर्च उचलताना दोन गोष्टींचा विचार करा.

१. तुमची ऐपत. तुमचं उत्पन्न किती, रिटायरमेण्टला किती दिवस राहिले, त्यानंतर निवृत्ती आर्थिक नियोजन तुम्ही काय केलं आहे, महागडा खर्च करण्याची तुमची खरंच आर्थिक तयारी आहे की कर्ज काढावं लागेल? 
२. तुमचं मूल खरंच ‘जबाबदार’ आहे का? वेळेत शिक्षण पूर्ण करून, जे आवडेल ते शिकून पुढे सरकण्याचं त्याचं पॅशन आहे का? की मूल खुशालचेंडू आहे?
आता पहिली गोष्ट जर कर्ज काढून करायची असेल तर ते कर्ज तुम्ही कशाला घ्यायला हवं?- मुलांनाच घेऊ द्या! त्याचे काही फायदे.
१. त्यांच्या शिक्षण निर्णयाचीच नाही, तर आर्थिक गोष्टींचीही मालकी त्यांच्याचकडे असेल. कर्ज लहान घेतलं तरी चालेल; पण मुलांना जबाबदारी कळली पाहिजे.
२. शिक्षण संपलं की सहा महिन्यांनी कर्जफेड सुरू होते, त्यामुळे शिक्षण वेळेत संपवण्याचं बंधन आपोआप येतं. 
३. पैशाचं महत्त्व समजतं, बजेटमध्येच भागवावं लागतं.
४. आपली डिग्री  ‘एम्पलॉयबल’ करण्याचं बंधन येतं. कर्ज फेड आपल्यालाच करायची आहे, हे डोक्यात असतं.
५. असं कर्ज घेतल्यानं काही पालकांचे-मुलांचे संबंध खराब होत नाहीत. तरुण मुलांना इंडिपेंडण्ट व्हायचं असतं, तर त्याला आर्थिक जबाबदारीची जोड हवीच.

Web Title: Should I take an education loan for children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.