SNDT महिला विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीमुळे सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:23 AM2022-07-14T10:23:48+5:302022-07-14T10:24:42+5:30

हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. 

SNDT women's university postpones today's exams due to heavy rains | SNDT महिला विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीमुळे सतर्कता

SNDT महिला विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीमुळे सतर्कता

Next

मुंबई  - मुंबई विद्यापीठानंतर आता एसएनडीटी महिला विद्यापीठाकडून आज होणाऱ्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने एसएनडीटी महिला विद्यापीठात, आज होणार्‍या ऑफलाइन सर्व पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या असून सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल असे संचालक परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे डॉ संजय शेडमाके यांनी जाहीर केले आहे.

मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर यंत्रणांची तारांबळ उडाली. मुंबई परिसरातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला. मुंबईत सखल भागांत पाणी साचले, रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू होती, तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला. दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. 

दक्षिण ओडिशा तटीय क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशातील हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती गुरुवारी कायम राहील. पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

  

 

Web Title: SNDT women's university postpones today's exams due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा