...तर नववीऐवजी आठवीलाच नापास; नियमात स्पष्टता आणण्याची शिक्षण क्षेत्रातून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:33 AM2023-12-19T06:33:59+5:302023-12-19T06:34:07+5:30
यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी आणि पुढील आव्हाने-स्पर्धांसाठी तयार होता यावे, यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. मात्र, त्यामुळे दहावीचा निकाल वाढविण्यासाठी नववीऐवजी आठवीलाच नापास करण्याचा प्रकार वाढू शकतो, याकडे काही शिक्षकांनी लक्ष वेधले, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करण्यासाठी मिळालेला वेळही पुरेसा नसून त्याबाबत पुरेशी स्पष्टता यावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.
यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. एप्रिलमध्ये निकाल लागल्यानंतर पुनर्परीक्षा जून-जुलैमध्ये घेतली जाईल, परंतु ‘३० एप्रिलनंतर शाळेला सुट्टी लागते. संपूर्ण मे महिना सुट्टीत जातो. शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर, लगेचच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. एप्रिलमध्ये मिळणारे अवघे १० ते १२ आणि जूनमध्ये मिळणारे १० ते १२ दिवस या साधारण २० ते २५ दिवसांत विद्यार्थ्यांना वर्षभरात शिकविलेल्या विषयाची तयारी कशी करून घ्यायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे पूरक मार्गदर्शनाबाबत पुरेशी स्पष्टता यायला हवी,’ अशी अपेक्षा ‘लायन एम.पी. भुता सायन सार्वजनिक स्कूल’चे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी व्यक्त केली.
भीती अनाठायी
काही शिक्षकांनी ही भीती अनाठायी असल्याचे म्हटले आहे. ‘परीक्षा व्यवस्थेचे सनियंत्रण करण्यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’च्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
याशिवाय तालुका, जिल्हा स्तरावर समित्या कार्यरत असतील. ज्या शिक्षकांना आपल्या मुलांच्या निकालाविषयी शंका असतील, त्यांना या समितीकडे दाद मागता येईल,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली.
बाह्य पर्यवेक्षण आवश्यक
दुसरे म्हणजे ‘अनेकदा दहावीचा निकाल चांगला लागावा, म्हणून कच्च्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करण्याकडे काही खासगी शाळांचा कल असतो. हा प्रकार आता आठवीतच होऊ लागेल,’ अशी भीती एका शिक्षकाने व्यक्त केली.
त्यामुळे शाळांच्या परीक्षा-निकाल पद्धतीत पारदर्शकता यायला हवी आणि या सगळ्याचे बाह्य पर्यवेक्षण होणे आवश्यक आहे, अशी गरज व्यक्त होत आहे.
परीक्षा कशी होणार?
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू आहे. त्यानुसार, एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नव्हते.
परीक्षेचे दडपण न राहिल्याने मुले अभ्यास करत नाहीत, अशी सार्वत्रिक ओरड होत हाेती. त्यामुळे पाचवी आणि आठवीकरिता पुन्हा एकदा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, दोन्ही इयत्तांकरिता प्रत्येक विषयासाठी ५० ते ६० गुणांसाठी ही परीक्षा होईल. भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे.
अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे का, हे तपासले जाईल. ही वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. किमान ३५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र, याही परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाईल.