अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

By रेश्मा शिवडेकर | Published: May 29, 2024 06:48 PM2024-05-29T18:48:40+5:302024-05-29T18:49:11+5:30

तिन्ही शिक्षण मंडळाचे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली

Square will increase for 11th admission; Most of the students score more than 90 percent in SSC | अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाबरोबरच (एसएससी) सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मुंबईत अकरावी प्रवेशासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. यामुळे अकरावीच्या कटऑफमध्ये यंदा एक ते दोन टक्क्यांनी वाढ संभवते.

दहावीला मुंबई शहर-उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या भागातून उत्तीर्ण झालेल्या ३.२५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार टक्के म्हणजे १३,४३० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १,६४५ने वाढली आहे. तर ३० टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतून ९७,३५४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

दुसरीकडे आयसीएसईच्या ५,२३० विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांवरून अधिक गुण मिळविले आहेत. सीबीएसईने यंदा विभागनिहाय आकडेवारी दिलेली नाही. मात्र या मंडळातूनही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. देशभरात सीबीएसईच्या २.१० लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर सुमारे ४८ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक टक्के मिळविले आहेत. तिन्ही मंडळाच्या दहावीच्या टक्केवारीत वाढ झाल्याने कटऑफ वाढण्यात शक्यता आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांचा इंटिग्रेडेड कोचिंगकडे कल असला तरी कला आणि वाणिज्य शाखेत प्रवेशाकरिता चुरस कायम असेल. 

मुंबईतील कॉलेजेस, उपलब्ध जागा (२०२३-२४ची आकडेवारी)

मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ज्युनिअर कॉलेजेस - १,०१६

उपलब्ध जागा - ३.७५ लाख

गेल्या वर्षी भरल्या गेलेल्या जागा - २.८ लाख

राज्याचे तीन बोर्डांचे एकूण निकाल

एसएससी - ९४.९ टक्के

आयसीएसई - ९९.९

सीबीएसई - ९६.५

५० टक्के प्रवेश

गेल्या वर्षी मिठीबाई कॉलेजमध्ये अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोटा वगळून कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या २,५०० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ५० टक्के जागांवर एसएससी वगळता अन्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

Web Title: Square will increase for 11th admission; Most of the students score more than 90 percent in SSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.