विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:39 AM2021-07-17T05:39:26+5:302021-07-17T05:41:54+5:30
SSC Result : कोकण १०० टक्के. यंदाही मुलींचीच बाजी; तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा यंदाचा मुंबई विभागाचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून, केवळ ०.०४ टक्क्यांनी मुंबईचा शत प्रतिशत निकाल हुकला आहे. आतापर्यंतच्या दहावी निकालाच्या वर्षांत सर्वाधिक निकाल यंदा लागला असून निकालात मागील वर्षीपेक्षा ३.९४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर निकाल पाहणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे हे संकेतस्थळ क्रॅश होऊन विद्यार्थांना आपला निकाल पाहता आला नाही. रात्री उशिरापर्यंत निकालाचे संकेतस्थळ सुरूच झाले नव्हते. या तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात मुंबई विभाग इतर चार विभागीय मंडळांसोबत तिसऱ्या स्थानावर असून, मागील वर्षीपेक्षा यंदा क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दरम्यान, यंदाचा निकाल हा सर्वस्वी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर अवलंबून आहे, तर दरवर्षीचा निकाल हा प्रत्यक्ष परीक्षा पद्धतीवर आधारित असतो. त्यामुळे यंदाच्या निकालाची तुलना ही मागील वर्षांच्या कोणत्याही निकालाशी होऊ शकत नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
निकालाची उत्सुकता असताना, निकाल तयार असूनही संकेतस्थळ क्रॅश झाल्याने तो पाहता न आल्याने शिक्षक संघटना, विद्यार्थी, पालक वर्गाकडून राज्य शिक्षण मंडळाच्या या गैरसोयीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु, दुपारचे दोन वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परिणामी साईट क्रॅश झाली, असे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगितले जात असून दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
यंदाचा निकाल ऐतिहासिक असून, निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला असून, त्यात कोकण विभागाचा निकाल १०० टक्के तर नागपूर विभागाचा निकाल इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी ९९.८४ टक्के लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून प्राप्त झाले. त्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील तब्बल १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार २९४ एवढी आहे. राज्यातील ४ हजार ९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ९१६ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र ठरले असून ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे,
शिक्षणमंत्र्यांची अतिघाई विद्यार्थी, पालकांना मनस्ताप देई
शिक्षणमंत्री आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने तसेच निकाल लावण्याची अतिघाई केल्यामुळेच साईट क्रॅश होण्याचा प्रकार घडून आला. त्यामुळे अनेक पालक, विद्यार्थी व शिक्षक मोबाईल व कॉम्प्युटरसमोर ताटकळत बसल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुदानित व विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय डावरे यांनी दिली. यासोबत एकूण मूल्यमापन केलेल्या १५,७५,७५२ विद्यार्थ्यांपैकी १५,७४,९९४ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, तर उर्वरित ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे, यामागील कारणेही मंडळाने स्पष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना जो मनस्ताप सहन करायला लागला, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मंडळाच्या दहावीच्या नियोजनावर टीका केली.
रायगडचा निकाल ९९.९९
मुंबई विभागीय निकालात रायगड, ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर १, मुंबई उपनगर दोन यांचा समावेश होत असून, यंदाच्या निकालात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल मुंबई विभागात सर्वाधिक म्हणजे ९९.९९ टक्के लागला आहे. पालघर आणि मुंबई-१चा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९९.९६ टक्के, बृहन्मुबईची ९९.९६ टक्के आणि मुंबई-२ची निकालाची टक्केवारी ९९. ९७ टक्के अशी आहे.
जिल्हा - विद्यार्थी संख्या - उत्तीर्ण - टक्केवारी
ठाणे - ११४२८० - ११४२३७ - ९९.९६
रायगड - ३४९४१ - ३४९३९ - ९९. ९९
पालघर - ५७४७१ - ५७४४२ - ९९.९४
बृहन्मुंबई - ३१५६७ - ३१५५५ - ९९.९६
मुंबई १ - ६१२१७ - ६११८६ - ९९.९४
मुंबई २ - ४८१९१ - ४८१७८ - ९९.९७
मागील ६ वर्षांची मुंबई विभागाची निकालाची टक्केवारी
२०१६- ९१. ९० %
२०१७- ९० . ०९%
२०१८- ९०. ४१ %
२०१९- ७७. ० ४%
२०२०- ९६. ७२%
२०२१- ९९. ९६%
राज्याप्रमाणेच मुंबई विभागातही मुलींची बाजी
मुंबई विभागातून यंदा ३ लाख ४७ हजार ६६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुंबई विभागात ९९. १९ टक्के आहे तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९. ३५ टक्के आहे. यामुळे साहजिकच यंदाही राज्याप्रमाणेच मुंबई विभागात मुलींनीच बाजी मारली आहे. अनेक विद्यार्थिनींना लॉकडाऊनच्या काळात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षांत गुण कमी मिळाल्यास शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान दहावीच्या निकालात विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले असल्याने किमान त्यांचे पुढील शिक्षण चालू राहण्याची सकारात्मक आशा तरी असल्याचे मत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी विशेष प्राविण्यासह ७५ टक्के आणि आणि त्याहून किंवा ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. मात्र यंदा ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ७२ हजार ९१७ इतकी आहे. प्राविण्यासह विशेष श्रेणी व ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात मुंबई विभागात १ लाख १० हजार ९७९ हजार इतकी आहे. ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५९ हजार ८११ आहे तर ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८३० इतकी आहे.