SSC & HSC Exams: दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइनच, राज्य मंडळ ठाम; ११ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक साहित्य वाटपास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:09 AM2022-02-03T08:09:31+5:302022-02-03T08:09:43+5:30
SSC & HSC Exams: नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे.
औरंगाबाद : नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे. राज्य मंडळ नियोजनानुसार ऑफलाइन परीक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल, अशी माहिती विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी दिली.
‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर आले होते. यासंदर्भात बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसमवेत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनावरून दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलन ज्या पद्धतीने चिघळले त्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण विभागाची बाजू मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली. ऑफलाइन परीक्षा बंद करणे योग्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व त्यांचे कौन्सिलिंग करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाईल. ऑफलाइन परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांचा विरोध आहे असे अजिबात नाही. परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे यासह अन्य पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.
- वर्षा गायकवाड,
शालेय शिक्षण मंत्री