विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:00 AM2021-06-17T10:00:00+5:302021-06-17T10:00:32+5:30

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात दिलासा

ssc Students will get extra marks of extra curricular activity | विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण!

विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीचा निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण मिळणार; पण सवलतीचे कला गुण मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता त्यासंदर्भातील संभ्रम बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे दूर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त म्हणजेच सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

  दरवर्षी दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्या कामगिरीप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी तर होतोच शिवाय दहावीच्या निकालात गुणपत्रिकांतही निश्चितच होतो. एकीकडे यंदा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या नाहीत तरी त्यांच्या मागील कामगिरीवरून ते गुण देण्याचा निर्णय देण्यात येतो, तर दुसरीकडे कला गुणांचे प्रस्ताव सादर करूनही सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याने शिक्षण विभाग दुजाभाव करीत असल्याची टीका होऊ लागली होती. यासंदर्भात अनेक निवेदनेही शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपला आधीचा निर्णय अधिक्रमित करून बुधवारी नवीन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

कसे मिळतात 
सवलतीचे कला गुण
इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण.
इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५ गुण.
इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण.
तसेच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.
 

Web Title: ssc Students will get extra marks of extra curricular activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.