राज्यात पहिली ते आठवीच्या ८५ टक्क्यांहून अधिक शाळा सुरु, उपस्थिती मात्र बेताचीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:07 PM2021-01-29T14:07:21+5:302021-01-29T14:09:28+5:30
पहिल्या दिवशी सरासरी ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ जानेवारीपासून मुंबई महानगरपालिका वगळता ५ वी ते ८ वी च्या वर्गाच्या पहिल्या दिवशीच मिळालेल्या शाळांच्या माहितीनुसार राज्यातील ८५ टक्के शाळा सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एकूण ३० टक्के उपस्थिती दिसून आली असून या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसांत नववी ते बारावीच्या उपस्थितीप्रमाणे वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे वगळता बीड , बिळधान, जळगाव, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सांगली अशा बऱ्याच जिल्ह्यांची पहिल्या दिवशीची माहिती एससीईआरटीला काल सायंकाळी ६ पर्यंत मिळाली नाही. अन्यथा राज्यातील शाळा सुरु होण्याच्या प्रमाणाचं टक्केवारीत आणखी वाढ दिसून आली असती असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
राज्यातील ३६ जिल्ह्यांत मिळून पाचवी ते आठवीच्या वर्गांच्या एकूण ३३ हजार ४८७ शाळा आहेत. त्यामधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ही ३२ लाख ४५ हजार ५१२ इतकी आहे. या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या ही १ लाख ४५ हजार ६७ इतकी असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ही २८ हजार ८७ इतकी आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या वेळेस ज्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या होत्या तशाच त्या यावेळी ही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याआधी राज्यातील तब्बल ९७ हजार २२३ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ४९३ शिक्षकांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. याचसोबत २१ हजार २१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ही कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १६१ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या दिवशीच्या प्राप्त जिल्ह्यांच्या माहितीनुसार वाशीम , यवतमाळ , नाशिक, जालना, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अकोला, अमरावती, औरंगाबाद , चंद्रपूर , सातारा या जिल्ह्यांत ९० टक्क्यांहून अधिक शाळा सुरु झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ५० टक्क्यांहून धिक म्हणजे ५२ टक्के एवढे दिसून आले. इतर जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची उपस्थिती ३० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान असलेली दिसून आली. नागपूर जिल्ह्यांत ६४ टक्के शाळा सुरु होऊनही विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण केवळ ८ टक्के असल्याचे दिसून आले. भविष्यात हे प्रमाण हळूहळू वाढेल आणि विद्यार्थी शिक्षकांच्या , शिक्षणाच्या ओढीने पुन्हा शाळांमध्ये उपस्थिती लावतील अशी अपेक्षा पहिल्या दिवशीच्या उपस्थितीच्या निमित्ताने होत आहे.
मुंबईतील शाळा सुरु करण्याची मागणी
एकीकडे ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाला उपयुक्त पर्याय ठरत नसल्याने लवकरात लवकर मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी पालक आणि शिक्षकांच्या एका समूहाकडून होत आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत प्रवासासाठी रेल्वे सेवा उपलब्ध होत नाही, शाळांना निर्जंतुकीकरणासाठी साहित्य उपलब्ध होत नाही तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली जात नाहो तोपर्यंत शाळा नको असे मत पालक व शिक्षकांच्या दुसऱ्या समूहाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता मुंबई पालिका आयुक्त शाळाच्या बाबतीत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यनाचे लक्ष लागून आहे.