डिजिटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावतोय?; वाचा, विद्यार्थी अन् पालकांसाठी उपयुक्त टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:26 PM2021-02-23T17:26:25+5:302021-02-23T17:34:14+5:30
Digital Learning And Students Exams : परीक्षेचा अतिरिक्त ताण, सतावणारी चिंता आदी समस्यांना कसे सामोरे जावे आणि कशाप्रकारे या तणावातून मुक्त होता येईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या.
- डॉ. शिवांगी पवार, सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ
मुंबई - लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. सतत बदलणाऱ्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक आणि ऑनलाईन लेक्चर्स या साऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षेचा ताण आल्याने अनेक विदयार्थी चिंताग्रस्त झाल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांनाही या परीक्षेच्या तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे नाकारता येत नाही. परीक्षेचा अतिरिक्त ताण, सतावणारी चिंता आदी समस्यांना कसे सामोरे जावे आणि कशाप्रकारे या तणावातून मुक्त होता येईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या.
जसजसा परीक्षेचा कालावधी जवळ येतो तसतसा भीतीपोटी पोटात गोळा आल्यासारखे वाटू शकते. अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे वाटते. चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली टक्केवारी मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. तथापि, परीक्षेमुळे ताणतणाव, चिंताग्रस्त आणि नैराश्य येणे ही एक सामान्य स्थिती आहे. परंतु, आपल्याला हे जाणून देखील धक्का बसेल की हाच तणाव आपल्या कार्यक्षमतेवर परिणामकारक ठरू शकेल. हे एखाद्याच्या सामाजिक, भावनिक आणि वैयक्तीक विकासास अडथळा देखील आणू शकते. होय हे खरंय! ताणतणावामुळे आत्म-सन्मान कमी होतो आणि अपयशाची भीती येते. अशा प्रकारे, परीक्षेच्या कालावधीमध्ये मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपला मेंदू उच्च स्तरीय कोर्टिसोल सोडतात ज्यामुळे आपण विचार करू शकतो आणि तर्कशुद्ध विचारांच्या मार्गावर जाऊ शकतो.
परीक्षेच्या वेळी तणावमुक्त कसे राहता येईल?
आपल्याला अभ्यासाकरीता वेळापत्रक आखून त्यानुसार नियोजन करावे लागेल आणि त्याचबरोबर आपल्या खाण्या-पिण्याचे तसेच झोपेच गणित बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. असे केल्यास आपल्याला चिंतामुक्त राहण्यास मदत होईल. चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा, संतुलित आहार घ्या ज्यात ताजी फळे, भाज्या, शेंगा, डाळी आणि धान्य यांचा समावेश असेल. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले तसेच जंक फूड खाणे टाळा. सतत अभ्यास न करता अधून मधून ब्रेक घ्या. व्यायामासाठी थोडा वेळ काढता येईल हे सुनिश्चित करा. आपण चालणे, स्ट्रेचींग, धावणे किंवा योगा या पर्यायांचा अवलंब करू शकता. शांत आणि आनंदी राहण्यासाठी दररोज ध्यान करण्याचा प्रयत्न करा. शिवाय, आपण श्वासोच्छ्वास व्यायाम देखील करू शकता.
परिस्थिती स्वीकारा आणि त्यानुसार आपली कार्यक्षमता सुधारण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळापत्रक आखा. स्वत: ला रीफ्रेश करण्यासाठी नियमित विश्रांती घ्या. आपल्या परीक्षांची वेळेत तयारी करा. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. किंवा अगदी शेवटच्या क्षणी अभ्यासाला सुरुवात करू नका, तसे केल्यास मानसिक तणाव अद्भवू शकतो.
सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर करु नका. परीक्षेपूर्वी सोशल मिडियापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करा. याचे कारण असे आहे की आपण सोशल मीडियावर बराच वेळ घालल्याने आपला महत्त्वाचा वेळ खर्च होऊ शकतो आणि आपण जे वाचले आहे ते विसरु शकता.
पालकांनी काय करावे हे जाणून घ्या
पालकांनी हे नेहमी लक्षात घ्यावे की समाजातील प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून तुम्ही आपल्या मुलांवर दबाव आणण्याचे टाळले पाहिजे. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करु नका. आपल्या मुलामधील सुप्त गुणांची पारख करा आणि त्यांना कधीच इतरांच्या तुलनेत कमी असल्याची जाणीव करून देऊ नका.
आपल्या मुलांना केवळ नियमांच्या चौकटीत न ठेवता पुरेशी मोकळीक द्या. आपल्या मुलाची क्षमता जाणून घ्या आणि त्याला / तिला अधिक मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करा. जरी तो / ती अयशस्वी झाला किंवा त्याने चांगले गुण संपादन केले नाही तरीही निराश होऊ नका. पुढच्या वेळी त्यांना अधिक चांगले प्रयत्न करण्यास प्रवृत्त करा.
परीक्षेपूर्वी आपल्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा. आपले मुल तणावग्रस्त असल्याचे लक्षात येताच त्याचाशी मनमोकळी चर्चा करा व ताणावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या खाण्यापिण्याचा वेळा तसे पुरेशी झोप होत असल्याची खात्री करून घ्या.
पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. आपण काहीतरी करू इच्छिता किंवा आपण करू शकलो नाही म्हणून आपल्या मुलांना त्या गोष्टी करण्यास भाग पाडू नका. आपल्या मुलाच्या वर्तनाकडे तसेच त्यांच्यातील बदलाकडे वेळोवेळी लक्ष द्या. पालक म्हणून, तुम्हीसुद्धा स्वतःची योग्य काळजी घ्या. कारण मुलांना या काळात सहकार्य करण्यासाठी तुम्ही स्वतः निरोगी राहा.