विद्यार्थ्यांची पसंती आयटीआयला! ७१ हजारांहून अधिक जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:21 AM2023-06-16T10:21:45+5:302023-06-16T10:22:19+5:30
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ११ जुलैपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यभरातून अवघ्या चार दिवसांत ७१ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याखेरीज ६२ हजार ४६० विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले असून आतापर्यंत ५९ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी शुल्कही भरले आहे. विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येतील. यासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित भरण्यासाठी २१ जुलै रोजी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.
यंदा तीन नव्हे, तर पाच फेऱ्या
- आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या अर्ज नोंदणीला सोमवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे.
- गेल्या तीन-चार वर्षांपासून तीन नियमित फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी अशी प्रक्रिया होत होती.
- यंदा मात्र काही छोटे बदल प्रवेश प्रक्रियेत करण्यात आले आहेत.
- नियमित तीन, एक व्यवस्थापन आणि एक समुपदेशन अशा एकूण पाच फेऱ्या प्रवेश प्रक्रियेत होणार आहेत.
महत्त्वाची आकडेवारी
एकूण नोंदणी- ७१,३७४
अर्ज पूर्ण- ६२,४६०
शुल्क पूर्तता- ५९,३८९
प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळ याबाबत काही माहिती किंवा शंका असल्यास जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येते. -दिगंबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक