खासगी आयटीआयला विद्यार्थ्यांचे प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 10:42 AM2022-08-05T10:42:36+5:302022-08-05T10:42:46+5:30
पहिल्या फेरीत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीत राज्यातून ४० हजार ७१० प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या फेरीत आयटीआय प्रवेशासाठी एकूण ९२ हजार १४० जागा अलॉट झाल्या होत्या, त्यापैकी ४४ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व संचालनालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये खासगी आयटीआयचे ५६ टक्के तर शासकीय आयटीआयचे ४१ टक्के प्रवेश झाले आहेत.
आयटीआयच्या पहिल्या फेरीत झालेल्या प्रवेशांमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे. मुंबईमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण ५३.७५ टक्के इतके आहे. त्यानंतर नागपूर येथील ४८.५३ टक्के विद्यार्थ्यांनी, नाशिक विभागातील ५४६.५२ टक्के विद्यार्थ्यांनी आणि पुणे विभागातील ४५. ९७ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. सर्वात कमी प्रवेशाची निश्चिती औरंगाबाद विभागातून झाली (३४ टक्के) आहे.
खासगी प्रवेशाची टक्केवारी ५६.५२%
आयटीआय पहिल्या फेरीत शासकीय आयटीआयमधील
७५,७९९
जागा विद्यार्थ्यांना अलॉट झाल्या होत्या त्यापैकी विद्यार्थ्यांनी
३१,४७३
जागांवर प्रवेश निश्चित केले आहेत.
याशिवाय खासगी आयटीमधील १६ हजार ३४१ जागांवर प्रवेश अलॉट करण्यात आले होते, त्यापैकी विद्यार्थ्यांनी
९,२३७
जागांवर प्रवेश निश्चित केले आहेत.
प्रवेश निश्चिती दरम्यान विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआयपेक्षा खासगी आयटीआयला जास्त प्राधान्य दिले आहे. शासकीय आयटीआयची प्रवेशाची टक्केवारी ४१.५२% असून खासगी आयटीआयची प्रवेशाची टक्केवारी ५६.५२ टक्के आहे.