विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:54 AM2022-10-12T06:54:17+5:302022-10-12T06:54:40+5:30
परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र ‘कॉन्स्टिट्यूशन लॉ’ विषयाच्या पहिल्याच पेपरला विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यापीठाने महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्याने परीक्षा तब्बल तासभर उशिराने सुरू करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली.
परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर देण्यात आलेला पेपर हा गतवर्षीचा असल्याचे लक्षात आले. ही बाब महाविद्यालयांनी तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा एक तासासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा का पुढे ढकलली याचे उत्तरच मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला.
राज्यपाल, मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ
विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदने दिली. परंतु महाराष्ट्रातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही.
तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या खात्याकडे लक्ष घातल्याचे दिसत नाही.
कारण मुंबई विद्यापीठातील सर्व प्रमुख अधिकारी हे प्रभारी असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याची टीका युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.
‘जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करा’
ऐन परीक्षेच्यावेळी प्रश्नपत्रिका काढून घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाने योग्य न्याय द्यावा, मात्र जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी मनविसेचे सहसचिव संतोष धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आले.