विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती कळणार एका क्लिकवर; महास्टुडण्ट ॲप विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:29 AM2021-11-04T09:29:24+5:302021-11-04T09:29:34+5:30
राज्यात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात तंत्रस्नेही शिक्षक व शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनेच राज्यात सरल प्रणालीवर सर्व शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. त्यानंतर ही माहिती अद्ययावत करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती आता डिजिटल पद्धतीने लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून महास्टुडण्ट नावाचे ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप गुगल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे उपस्थिती भरण्यास मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी सांगितले.
राज्यात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात तंत्रस्नेही शिक्षक व शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनेच राज्यात सरल प्रणालीवर सर्व शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. त्यानंतर ही माहिती अद्ययावत करण्यात येते. भारत सरकारने परफॉर्मन्स ग्रेडिंग सिस्टम ही राज्यांचा शैक्षणिक निर्देशांक दर्शविणारी प्रणाली विकसित केली आहे.
यामध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शविण्यासाठी गुण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात राज्याने आणखी सुधारणा करावी, या उद्देशाने उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाकडून महास्टुडण्ट ॲप विकसित करण्यात आले आहे.
या ॲपच्या मदतीने शिक्षकांना अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी तत्काळ नोंदविता येणार आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक सांभाळून ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकताही राहणार नाही. त्यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावरील शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती कुठेही आणि केव्हाही एका क्लिकवर मिळू शकणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
शाळांमधील सुविधा गृहीत धरल्या का?
nराज्यातील सर्वच जिल्हा आणि तालुका स्तरावरील शाळांमध्ये संगणक आणि मोबाईलची सुविधा असल्याचे शिक्षण विभागाने गृहीत धरल्याचे संतप्त प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिल्या आहेत.
nया निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्याआधी सुविधांची माहिती घेणे, शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे ही कामे शिक्षण विभागाने करावीत आणि मग निर्देश द्यावेत अशी मते शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहेत.