Success Story: तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:56 PM2024-05-14T13:56:33+5:302024-05-14T15:00:53+5:30
देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात...
UPSC Success Story: युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानले जाते. या परीक्षेतून देशातील सर्वोत्तम अधिकारी निवडले जातात. त्यामध्ये IAS, IPS, IFS, IIS आणि अशा अनेक पोस्टसाठी अधिकारी निवडले जातात. देशात लोकसेवा नागरी परीक्षेद्वारे एकूण २४ पोस्टसाठी अधिकारी निवडले जातात. देशाच्या प्रशासनाची भिस्त या अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे ही परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याची इच्छा देशातील लाखो तरुणांची असते. पण इथली स्पर्धा पाहता यामध्ये खूपच कमी लोक यशस्वी होतात. लाखो परीक्षार्थींमधून जवळपास १ हजार परीक्षार्थींची निवड केली जाते.
देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात. अशा परीक्षार्थींसाठी आयएएस विजय वर्धन यांची यशोगाथा मोठी प्रेरणा देऊन जाते. तब्बल ३५ परीक्षांमध्ये अपयश येऊनही न थकता, न हार मानता तो लढला आणि जिंकलाही. विजय वर्धन यांनी विविध सरकारी परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांना वारंवार अपयश येत होते. अखेर वर्धन यांनी त्यांची सगळी जिद्द पणाला लावली आणि ते IPS झाले. त्यानंतर त्यांनी नंतर युपीएससीची परीक्षा दिली आणि अखेर ते IAS झाले. (Success Story Of IAS Vijay Wardhan)
तब्बल ३५ परीक्षांमध्ये अपयश तरीही हार नाही मानली अन्-
मूळचे हरियाणाचे असलेले विजय वर्धन यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे झाले. त्यानंतर वर्धन यांनी हिस्सारमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. युपीएससीची (UPSC Exam) तयारी करत असताना वर्धन यांनी इतर शासकीय जागांसाठी असणाऱ्या परीक्षा आणि राज्य सेवेच्या परीक्षाही दिल्या. त्यामध्ये हरियाणा राज्यासाठी असणारी पीसीएस, एसएससी आणि सीजीएल अशा ३५ परीक्षांचा समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तब्बल पाच वेळा युपीएससीची परीक्षा देऊनही त्यांना अपयश येत होते. तरीही त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नव्हते. त्यानंतर विजय वर्धन यांनी अधिक जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१८ ची युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. देशात १०४ रँक मिळवून त्यांनी IPS ची पोस्ट मिळवली. (union public service commission)
समाधान न मानता पुढची पायरी सर केली -
IPS ची पोस्ट मिळवूनही त्यांनी समाधान मानले नाही. त्यानंतरही वर्धन यांनी युपीएससीची तयारी सुरू ठेवली होती. अखेर २०२१ ची परीक्षा देऊन ते ‘आयएएस’ झाले. आयुष्यात वारंवार येणाऱ्या अपयशावर मात करत विजय वर्धन यांनी यशाचे शिखर गाठले. IAS होत त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. आयुष्यात कितीही संकटे आणि अपयश आले तर शांत राहून त्यावर मात करता येते हे वर्धन यांच्या यशोगाथावरून दिसते.
"स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा"
इतक्या संकटांवर मात करून यश मिळवल्यानंतर विजय वर्धन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी ते म्हणाले, ‘आयष्य मार्गक्रमण करत असताना आपणच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक असतो. आपण जेंव्हा एखादा निर्णय घेता तेंव्हा त्यावर ठाम राहिले पाहिजे. आपल्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. या प्रवासात आपल्या चुकांचे आपणच मूल्यमापन केले पाहिजे आणि धडा घेत राहिले पाहिजे. अखेर आपण आपल्या यशापर्यंत पोहचोतच, अशा भावना वर्धन यांनी व्यक्त केल्या.