शिक्षक दिन विशेष - विद्यार्थी घडविणारे आम्ही ....
By सीमा महांगडे | Published: September 5, 2022 10:06 AM2022-09-05T10:06:01+5:302022-09-05T10:06:01+5:30
मुंबईतील काही उपक्रमशील शिक्षकांचा घेतलेला हा थोडक्यातला परिचय.
शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत जीवन कसे जगावे हे शिकवीत असतात मात्र आज शिक्षक म्हटलं कि बेरोजगारी, प्रमाणपत्र घोटाळा आणि अशैक्षणिक कामानिमित्त सतत वर्गाबाहेर असणारे गुरुजी दिसतात. तरीही कमी विद्यार्थिसंख्या, वेगवेगळ्या परिसरातल्या वेगवेगळ्या भाषा, विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात जाणवण्याएवढी असलेली तफावत, त्यांना शाळेत आणण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड, अपुर्या भौतिक सुविधा, शैक्षणिक साधनांचा अभाव या आणि अशा असंख्य नकारात्मक बाजू असूनही काही शिक्षक अत्यंत तळमळीने, चिकाटीने आणि जिद्दीने आपले काम पुढे नेत आहेत. मुंबईतील अशाच काही उपक्रमशील शिक्षकांचा घेतलेला हा थोडक्यातला परिचय.
पाठयपुस्तकांच्या पलीकडे जाऊन ज्ञान मिळवावे
नीलम कुंभार, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी, दहिसर
विज्ञानाची शिक्षिका म्हटले कि केवळ प्रयोगशाळापुरते मर्यादित न राहता विविध विज्ञान संकल्पनेतून विद्यार्थ्यांकडून समाजपयोगी प्रकल्प घडवून आणणाऱ्या दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या उपमुख्याध्यापिका नीलम कुंभार. आपण जेव्हा प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करतो त्याचे यश नक्कीच मिळते मग विज्ञान प्रदर्शनातील एखादे पारितोषिक असो, विज्ञान प्रदर्शनातील इन्स्पायर अवॉर्ड असो किंवा शाळेच्या एखाद्या संशोधन प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावरील निवड असो हा त्यांच्या मूलमंत्र आहे.
शिक्षक हा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन सुद्धा शिकतात फक्त त्यांना तशी संधी दिली पाहिजे हे शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करत असताना अनेक वेळा अनुभवल्याचे नीलम कुंभार सांगतात. शाळेपासूनचा विज्ञान प्रदर्शनाचा प्रवास त्यांना इन्स्पायर अवॉर्ड २०११ साठी राज्यस्तरावर ही घेऊन गेला आहे. एक विज्ञान शिक्षिका म्हणून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सौर शुष्कक’ (सोलार ड्रायर ) या संशोधन प्रकल्पाची भोपाळ (मध्य प्रदेश) येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी निवड म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने विज्ञान मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग, निसर्ग भेटी इत्यादींचे आयोजन करता विद्यार्थ्यांना नेहमीच वेगळी ऊर्जा त्या देतात.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यात जास्त आधार देणारी गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती. ती कशी मिळवायची त्यापासून तिचा उपयोग कसा करायचा इथपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य व अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कुंभार यांनी आजपर्यंत केले. विशेष म्हणजे त्यानंतर शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांमधील वाढ याहून अधिक अभिमानाचा क्षण त्यांनी अनुभवला नसल्याचे त्या आवर्जून सांगतात. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली. सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या अशासकीय सेवाभावी संस्था आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या विद्यमाने आयोजित, ज्ञानरचनावादावर आधारित एखाद्या पाठाचे अध्यापन कसे करावे यासाठी नीलम यांनी निवडलेल्या गणितातील डिस्टन्स फॉर्म्युला या पाठाची निवड झाली . शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर या आदर्श पाठाचे चित्रीकरण करण्यात आले असून आजही युट्युब चॅनेल वर हा पाठ पाहण्यास उपलब्ध आहे. या माध्यमातून दैनंदिन अध्ययन-अध्यापन करताना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकां पलीकडे घेऊन जाण्याचा व प्रत्यक्ष अध्ययनाचा आनंद त्या विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
अनुभव संपन्न करणारा शिक्षक
विलास परब , बालमोहन विद्यामंदिर
पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना अनुभवातून समृद्ध करणे हाच शिक्षणाचा शिक्षणाचा हेतू मानून बालमोहन विद्यामंदिर, शिवाजीपार्क येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक म्हणजेच विलास परब होय. अभियंत्याची पदवी हाती असलेल्या परब सरानी यंत्रामध्ये रमण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये रमायचे ठरवले आणि मग त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून अनुभव संपन्न करणारी वाटचाल सुरु झाली.
अनुभव संपन्न करणाऱ्या या शिक्षकाचे ज्ञानदानाचे मार्ग विविध प्रकल्प व उपक्रमातून वाट काढतात. शहरातील मुलांना निसर्गशिक्षण देण्यासाठी निसर्गात जाऊनच शिकता येते या भूमिकेतून ते विद्यार्थयांसाठी निसर्ग फेरीचे नियमित आयोजन करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राख्या बांधून वृक्ष सनसंरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ते मुलांना देतात.पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी आपले उत्सव पर्यापूरक करण्यासाठी विदयार्थ्याच्या मदतीने गणेशोत्सवात गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यासाठी नागरिकांना मुलांकरवी आवाहन ही करतात जेणेकरून नवीन पिढी पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील होऊ शकेल.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरतेचे धडे दिले तर भविष्यातील त्यांच्या फसवणुकीला आळा घालता येईल यासाठी शाळास्तरावर ६ वी ते १० वी च्या प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक साक्षरतेचे धडे देऊन बालमोहन विद्यामंदिर ही मनी स्मार्ट स्कुल म्हणून भारत सरकारकडून घोषित करून घेण्यात विलास परब यांचा मोठा वाटा आहे. परब यांचे विद्यार्थी केवळ बालमोहन पुरते मर्यादित नसून दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींनाअद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून परब यांनी त्यांची सोय केली . या शिवाय वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलान्साठी गेली कित्येक वर्षे ते दुपारच्या जेवणाची ही सोय करीत आहेत.
विद्यार्थ्यांची क्लेमधील रुची वाढावी यासाठी विलास परब विद्यार्थ्यांना फेस्टिव्हल , विविध चित्र प्रदर्शने यांनाही घेऊन जातात. विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि चिकित्सक वृत्ती वाढीला लागावी म्हणून त्यांनी नेहरू विज्ञान केंद्राशी ही शाळेला जोडून घेतले आहे. शिकणे शिकविणे आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतून विलास परब अप्लाय विद्यार्थ्यां अनुभव समृद्ध करून त्यांच्या संकल्पना आणि ज्ञानाला अधिक वृद्धिंगत करण्यास मदत करीत आहेत.
साहित्यातून ज्ञानाचा दिवा पेटवणारी शिक्षिका
मीना मिश्रा
एकीकडे वर्गात विद्यार्थ्यांना कठीण अशा इंग्रजीचा सहज सोप्या पद्धतीने सामना करावा हे शिकविणाऱ्या शिक्षिकेसोबत मानवी भावभावनांचा उत्कट आविष्कार, अशांत मनाला शांत करण्याची ऊर्जा, प्रतीकात्मक लेखन ही मीना मिश्रा यांच्या साहित्यिका म्हणून असणारी लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षक हा कधीच एका साच्यात अडकलेला नसती याचे उत्तम उदाहरण म्हणजे मीना मिश्रा असून त्यांनी आपल्या साहित्यातूनही विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचा मानस बाळगला आहे. आपल्या यंग ब्रँड्स या प्रकल्पातून त्यांनी हजारो शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची गोडी तर लावलीच सोबत आपली प्रतिभा मांडण्याची संधी ही दिली.
आजकालच्या स्पर्धेच्या युगात एसएससी बोर्डाचे विद्यार्थी इतर बोर्डांच्या तुलनेत कमी पडतात की काय? ही केवळ भीती बाळगून चालणार नाही म्हणून त्यासाठी काहीतरी केले पाहिजे ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी देशभरातील एसएससी बोर्डाच्या शिक्षकांना त्यांच्या एसएससी वॉरिअर्स या गटामार्फत मोफत प्रशिक्षण दिले. महाराष्ट्रातील इंग्रजी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी केवळ इंग्रजी माध्यमांपुरतच मर्यादित न राहता इतर सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना त्यांच्या या प्रकल्पांतर्गत एक नवीन प्रेरणा मिळाली. गेली २६ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करीत असलेल्या या शिक्षिकेचे कार्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता देशभरात अविरत चालू आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाचे अधिकृत प्रकाशक 'बालभारती' या मंडळातर्फे नवीन पाठ्यपुस्तकांसाठी समीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आजपर्यंतचे त्यांचे लेख आणि विचार विविध शैक्षणिक मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होत असतात. माध्यमिक शालांत परीक्षेच्या शिक्षकांसाठी मोफत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी त्यांनी एसएससी वॉरियर्स नावाचा गट तयार करून ज्ञानदानासोबतच गुणदानाच्या प्रक्रियेत सरलता आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह अनेक शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
द इम्पिश लास पब्लिशिंग हाऊसचाय सीईओ असणाऱ्या मीना मिश्रा यांनी हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या विनामूल्य प्रकाशन "द यंग बार्ड्स"प्रकल्पांतर्गत प्रकाशित होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भाषेवर प्रभुत्त्व मिळविल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रतिभांना , संकल्पनांना कुठलाही अडथळा येत नाहीए सा विश्वास टाय व्यक्त करतात.
शिक्षण प्रवाहात विद्यार्थ्यांना मागे न राहू देणारा शिक्षक
सचिन नरेश म्हात्रे, दोसीबाई जीजीभॉय हायस्कूल,जोगेश्वरी(पूर्व),मुंबई
कोणत्याही कारणस्तव वर्गातील विद्यार्थी मागे राहू नये किंवा त्याच्या कमी गुणांमुळे त्याला नववीतून अनुत्तीर्ण करण्यात येऊ नये या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडून तयार करण्यात आलेल्या ऍक्सीलेटेड लर्निंग प्रोग्रॅमचे मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या सचिन म्हात्रे यांनी काम पाहिले. हुशार व नियमित विद्यार्थी नेहमीच उत्तीर्ण होतात मात्र वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतून आलेल्या आणि अभ्यासात जेमतेम असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेच्या चांगल्या श्रेणीत आणण्याचा विडाच म्हात्रे यांनी उचलला आहे. मुख्याध्यापकांसाठी विविध उपक्रम आणि प्रकल्पामधून विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना नवीन आयाम देणारा हे शिक्षक विद्यार्थ्यांचे ही विशेष प्रिय आहेत.
ब्रिटिश कौन्सिलच्या (ELISS) या प्रकल्पामधून इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देण्याची संधी ही सचिन याना मिळाली असून एएलपी प्रकल्पामधून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना दहावीचा टप्पा चांगल्या गुणांनी पार करण्यास मदत केली आहे. संबोधन अध्यापन, विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन या पद्धतीने वर्गातील अभ्यासात जे विद्यार्थी मागे आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीवर आणणे हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे तयांनी सांगितले.
या शिवाय रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते मासूम या संस्थेच्या माध्यमातून शिकवीत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी दोन इंग्रजी विषयाची पुस्तकेही लिहिली आहेत. याशिवाय समग्र शिक्षा अभियानाच्या चेस (CHESS- Continuous Help to teachers of English from Secondary Schools )या उपक्रमातून इयत्ता नववी, दहावीला शिकवणाऱ्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना ही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. इंग्लिश डे सारख्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रह ,व्याकरण कौशल्य व संभाषण कौशल्याला ते चालना देत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. विश्वसेह म्हणजे त्यांच्या योध्यापनाचे व्हिडीओ विद्यार्थ्यंसाठी युट्युबवर उपलब्ध असून विद्यार्थी त्या माध्यमातून केव्हाही अध्ययन करू शकतात. सर्व व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थी केव्हाही ते पाहू शकतात. माझ्या ओंजळीत जी ज्ञानपुष्पे आहेत ती हजारो विद्यार्थ्यांच्या ओंजळीत आज जात आहेत याचा उपक्रमशील शिक्षक म्हणून अभिमान वाटत असल्याचे मत ते व्यक्त करतात.