शिक्षक, पालकांनो, सावधान! विद्यार्थ्यांना ‘चॅट-जीपीटी’ची चटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:26 AM2023-05-23T08:26:45+5:302023-05-23T08:26:52+5:30
वैचारिक क्षमतेवर परिणाम होण्याची भीती!
- नम्रता फडणीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हल्लीच्या पिढीला बुद्धीला ताण न देता सगळंच ‘इन्स्टंट’ हवंय. त्यामुळेच अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘चॅट-जीपीटी’चा भारतात अधिक वापर हाेताना दिसत आहे. अगदी पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही प्रोजेक्ट किंवा शैक्षणिक गोष्टींसाठी ‘चॅट-जीपीटी’चा वापर करतात.
या कृत्रिम तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर परिणाम होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. चॅट -जीपीटी हे फक्त एक लर्निंग मॉडेलसारखे आहे. ते फक्त फीड डेटाच्या आधारेच प्रतिसाद देते. त्यामुळे वैचारिक क्षमतेवर परिणाम हाेण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फायदे अन् धाेके?
गुगलच्याच धर्तीवर ‘एआय’ने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ‘चॅट-जीपीटी’ हे तंत्रज्ञान विकसित केल्याने कामे कमी वेळेत होत आहेत. हे वरदान वाटत असले तरी याने अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगितले जात आहेत. उदा. जटिल प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढीस लागू शकते. परंतु, याचा बौद्धिक क्षमतेवरदेखील परिणाम होऊ शकतो.
चॅट -जीपीटी म्हणजे काय?
चॅट-जीपीटी एआयने विकसित केलेले नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, बातम्या, मुलाखतीसाठी प्रश्न आदी फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. ई-मेल, निबंध कसे असावेत, यासाठीही ‘चॅट-जीपीटी’चा वापर केला जाऊ शकतो.
तुलनेत फरक
गुगल मागितलेली माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी वेब पृष्ठे अनुक्रमित करते, तर चॅट-जीपीटीमध्ये प्रशिक्षण डेटामधून शिकलेल्या माहितीचा वापर होतो. चॅट-जीपीटी फक्त २०२१ पर्यंतची माहिती देऊ शकते.
या देशांनी घातली बंदी
अधिक डेटा वापरला जाईल व गैरवापराच्या भीतीने या तंत्रज्ञानावर आधी इटलीने बंदी घातली. त्यानंतर चीन, नॉर्थ कोरिया, सिरीया, क्यूबा, इराण आणि रशियानेही यावर बंदी घातली.