ऑनलाइन गणित शिकविणे आहे अवघड; मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:50 AM2020-08-24T02:50:20+5:302020-08-24T07:09:53+5:30
ऑनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
मुंबई : कोविड-१९च्या सद्य:परिस्थितीत शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या आदेशानुसार आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, या दरम्यान आॅनलाइन शिक्षण घेत असताना, विशेषत: गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये विद्यार्थी, पालकांनाच नाही, तर ७५% हून अधिक मुख्याध्यापकांनाही अडचणी येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गणितात अनेक सिद्धांत, समीकरणे असतात, ती फळ्यावर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात. विज्ञानातले प्रयोगही प्रत्यक्ष दाखविल्याशिवाय समजून घेणे शक्य नसल्याने हे विषय आॅनलाइन शिकविणे शक्य नसल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
ऑनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी आधी केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार, केंद्रीय विद्यालयाच्या ७६% मुख्याध्यापकांना, ३९% विद्यार्थ्यांना, नवोदय विद्यालयाच्या ७१% मुख्याध्यापकांना, ६०% शिक्षकांना आणि ३३% विद्यार्थ्यांना आॅनलाइन गणित शिकणे, शिकविणे कठीण वाटते. सीबीएसई मंडळाच्या ७८% मुख्याध्यापकांना, तर ४५% विद्यार्थ्यांना आॅनलाइन गणित अवघड वाटत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकण्यातही अडचण येत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
आॅनलाइन शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या टीव्ही, पुस्तके, लॅपटॉप अशा साधनांमध्ये रेडिओ माध्यमाचा वापर सगळ्यात कमी होत असलेला दिसून येत आहे. आॅनलाइन शिक्षणादरम्यान केंद्रीय विद्यालयाच्या ३९%, नवोदयच्या ३३ तर सीबीएसईच्या ४५% विद्यार्थ्यांना गणित अवघड जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सीबीएसई मंडळाच्या १२%हून अधिक विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण
म्हणजे ओझे वाटते, तर ३९% विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणामुळे समाधानी असल्याची बाब समोर आली आहे.
आॅनलाइन शिक्षणाचा त्रास होत असल्याचे मत केंद्रीय विद्यालयातील ६% विद्यार्थ्यांनी व्यक्त केले, तर ३३% विद्यार्थी यामुळे समाधानी आहेत. २४% विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण कठीण वाटते. नवोदय विद्यालयातील २५% विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण कठीण वाटते, तर ३३% विद्यार्थी यामुळे समाधानी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अभ्यासासाठी मोबाइलचा वापर
आॅनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी आधी केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, सीबीएसईचे ८२%, केंद्रीय विद्यालयाचे ८४%, तर नवोदय विद्यालयाचे ८७% विद्यार्थी अभ्यासासाठी मोबाइलचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.