कार्बन डायऑक्साइड नियंत्रणावर तंत्रज्ञान; IIT मुंबईचे विद्यार्थी ठरले ८५ लाखांचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:02 AM2021-12-07T06:02:44+5:302021-12-07T06:03:02+5:30
एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे.
मुंबई : औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमची तब्बल ८५ लाखांच्या बक्षिसासाठी निवड झाली आहे.
एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे. या चमूमध्ये श्रुती भामरे, श्रीनाथ अय्यर, अन्वेषा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी मार्गदर्शन केले आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे. तापमानवाढीसाठी मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन प्रमुख कारण असून मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडसारखे ग्रीनहाऊस वायूही कारणीभूत आहेत.
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञानात पहिल्या टप्प्यांत उद्योगातून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्साइडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतर करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही एकमेव संस्था ठरली आहे. एक्सप्राइझ आणि एलन मस्क फाउंडेशनने एप्रिल महिन्यात सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या पुरस्कारांची घोषणा केली होती.
या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल, अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमानवाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्साइडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानामध्ये १.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे समोर आले आहे. कार्बन डायऑक्साइडच्या उगमाच्या ठिकाणीच रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे दत्ता यांनी सांगितले.
प्रत्यक्ष प्रयोग करवा लागणार
या चार वर्षांच्या या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.