फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 08:49 AM2023-06-04T08:49:20+5:302023-06-04T08:50:13+5:30

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकांनी निकालाआधीच कोणत्या ना कोणत्या कोचिंग क्लासला प्रवेश घेऊन अकरावीची तयारीही सुरू केली असेल. दहावीची परीक्षा झाली रे झाली की कोचिंग क्लासकडून पालकांना संपर्क साधला जातो. तुमच्या पाल्यासाठी आमचा क्लास कसा योग्य आहे, हे सांगितले जाते.

telemarketing funda of coaching classes | फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा

फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा

googlenewsNext

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

दिवसभरात आपल्या मोबाइलवर कोणत्या ना कोणत्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वा अन्य कोणत्या तरी फायनान्स स्कीमविषयीचे कॉल्स येत असतात. सुरुवातीला हे कॉल अनवधानाने रिसिव्ह केले जातात. मात्र, नंतर त्याच मालिकेतील नंबरवरून कॉल येऊ लागले की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करता येते. किंबहुना स्मार्टफोनच संबंधित नंबर हा ‘जंक कॉल’ असल्याचे सूचित करतो. तर अशा या डेबिट, क्रेडिट कॉल्सना सरावलेल्या कानांवर आता ‘तुमचा मुलगा दहावीला आहे ना सर. त्याला दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. विज्ञान शाखेसाठी आमची संस्था सर्वोत्तम आहे. तुम्ही आमच्या क्लास/कॉलेजला ॲडमिशन घ्या,’ असे आग्रहाचे निमंत्रण पडू लागले आहे.

दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थी आणि पालक जरा कुठे सुटकेचा नि:श्वास टाकत नाहीत, तोच साधारणत: आठवडाभरातच पालकांचे मोबाइल खणखणू लागतात. मुलगा/मुलगी दहावीला आहे. त्याच्या करिअरचा विचार केला आहे का. त्याला कशात रुची आहे. भविष्यात त्याला काय शिकायचे आहे वगैरे प्रश्न विचारून आमच्या कोचिंग क्लासच्या अमक्या दिवशी होणाऱ्या सेमिनार वा वर्कशॉपला पाल्यासह हजर राहा, असे सांगितले जाते. सुरुवातीला कानांना हे बरं वाटतं. मात्र, हळूहळू या कॉल्सची संख्या वाढत जाते. दिवसभरातून एक वा दोनदा येणाऱ्या कॉल्सची संख्या पाच- सहावर पोहोचते. वेगवेगळे कोचिंग क्लासेस, त्यांचे शुल्कांचे वेगवेगळे पॅकेज आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची यादी आपल्यासमोर सादर होऊ लागते. त्यातून तुम्ही पाल्यासाठी योग्य ती निवड करायची असते. ॲडमिशनचे निकालानंतर पाहू काय ते, असे उत्तर दिले तर तुम्हाला तोपर्यंत उशीर झालेला असेल, वगैरे सांगून भीतीही घातली जाते.

डेटा मिळतो कुठून?

- अचानक एवढ्या साऱ्या कोचिंग क्लासचे वा निवडक कॉलेजांचे आपल्याला फोन कसे काय येऊ लागले, आपण तर यांच्याकडे कधी विचारणा केली नव्हती, वगैरे सहजसोपे प्रश्न पालकांना पडतात. 
-  मात्र, सध्याचे युग डेटाचे आहे. ज्याच्याकडे जास्त डेटा तो सर्वात श्रीमंत - थोडक्यात डेटा इज न्यू ऑइल - असे म्हटले जाते.
-  साहजिकच कोचिंग क्लास वा कॉलेजेसकडे हजारो विद्यार्थ्यांचा डेटा सहजी उपलब्ध असतो. त्यासाठी काही एजन्सी काम करत असतात. 
-  या एजन्सींकडून विद्यार्थ्यांचा डेटा रीतसर विकत घेतला जातो, हा एक मार्ग किंवा शाळांकडून वा दहावीचे कोचिंग क्लास चालविणाऱ्यांकडून हा डेटा उपलब्ध केला जातो, हा दुसरा मार्ग.

पाल्याचा कल ओळखा...

डेटाच्या उपलब्धतेनंतर सुरू होते टेलिमार्केटिंग. मात्र, केवळ टेलिमार्केटिंगला किंवा त्यांच्या ऑफर्सना भुलून घाईने निर्णय न घेतलेलाच बरा. कारण येथे मुलाच्या भविष्य निश्चितीचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही क्लास वा कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी मुलाचा कल कोणत्या ज्ञान शाखेकडे आहे, याची तपासणी करून घेणे केव्हाही योग्य, अशी स्पष्टता असेल तर टेलिमार्केटिंगवरून कितीही भूलभुलैया योजना सांगितल्या गेल्या तरी तुमचा निर्णय चुकणार नाही. अखेरीस चॉइस इज युअर्स...

कोचिंग क्लासकडून केले जाणारे टेलिमार्केटिंग हे पालकांच्या मनावरील गारूड आणि भीती यांना खतपाणी घालण्याचे काम आहे. विशिष्ट परीक्षांमध्ये यश मिळवलं तरच करिअर घडू शकतं, असं त्यातून भासवलं जातं. मात्र, पालकांनी सारासार विचार करून तसेच आपल्या पाल्याचा कल ओळखून या प्रकाराकडे पाहायला हवे. क्लासेसच्या टेलिमार्केटिंग पद्धतीला न भुलता त्यावर योग्य विचारमंथन करून पाल्याच्या करिअरची दिशा ठरवणे उचित ठरते. - किशोर दरक, शिक्षण शास्त्राचे अभ्यासक.


 

Web Title: telemarketing funda of coaching classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.