‘त्या’ पुस्तकांची योजना सरकारने गुंडाळली...! बालभारतीकडून लवकरच पुस्तके बदलली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 08:38 AM2023-02-28T08:38:58+5:302023-02-28T08:39:24+5:30
निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे या हेतूने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला आहे.
निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर सद्यस्थितीत राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये वितरित करण्यात आलेली एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मविआ सरकारच्या काळात सृजन बदल एकात्मिक व द्विभाषिक स्वरूपात मिळतील तसेच शिक्षण, विचारांसह कल्पकतेला वाव देत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती बालभारतीकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून इयत्ता पहिलीची
पाठ्यपुस्तके शासनाच्या सर्व शाळांमध्ये तसेच इयत्ता दुसरीची पाठ्यपुस्तके केवळ ४८८ आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वितरित केली होती.
मात्र आता एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची अमंलबजावणी करताना काही बाबी निदर्शनास आल्याने शालेय शिक्षण विभागाकडून या पुस्तकांच्या पुढील निर्मितीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
पुस्तके रद्द करण्याची कारणे
या पाठ्यपुस्तकांच्या अनुषंगाने समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केली असता, द्विभाषिक पद्धतीचा वापर करताना विद्यार्थ्यांना मूळ भाषा शिकण्यात अडचणी येत असल्याचे व त्यामुळे मूळ भाषेचे (मातृभाषा) शिक्षण योग्य प्रकारे होत नसल्याचे आढळून आले आहे.
एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके ही विशिष्ट सूत्राभोवती (थीम) गुंफलेली असल्यामुळे मराठी भाषा, इंग्रजी भाषा व गणित या विषयांची तर्कसंगत मांडणी करताना तसेच व्याकरणाचे शिक्षण देताना अनेक अडचणी येत असल्याचे आढळून आले आहे.
निपुण भारत अभियानानुसार नवीन अध्ययन निष्पत्तीचा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक (बालवाटिका, बालवाडी व अंगणवाडी) स्तरापासून ते इयत्ता तिसरीपर्यंत करण्यासाठीचे केंद्र शासनाचे निर्देश/सूचना आहेत. दरम्यान, निपुण भारत अभियानामध्ये नमूद केलेल्या अध्ययन निष्पत्तीच्या स्तरापेक्षा एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकासाठी वापरलेल्या अध्ययन निष्पत्तींचा स्तर कमी दर्जाचा असून, जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.