पूर्वीप्रमाणे सीईटी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार, सीईटी सेलचा शासनाला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:45 AM2023-06-01T08:45:57+5:302023-06-01T08:46:18+5:30
मंजुरीनंतर सर्व प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सीईटी सेलअंतर्गत विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रियेत कपात करण्यात आली होती. त्यामुळे सीईटी सेलकडून तीन ऐवजी दोन प्रवेशाच्या फेऱ्या घेण्यात येत होत्या, आता यात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेशाच्या तीन फेऱ्या केल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सीईटी सेलकडून सरकारकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार आहे.
राज्य सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेऱ्या वाढल्याने त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. विविध फेरीतून प्रवेश निश्चित करून जागा भरल्या जातात.
कमी कालावधीत प्रवेशासाठी निर्णय
एमएचटी सीईटींतर्गत होत असलेले अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या गेल्या वर्षी घेण्यात आल्या होत्या.
मात्र, एकात्मिक तीन वर्षे अभ्यासक्रम, एमएड द्विवर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, बीपीएड द्विवर्षीय, विधी पाच वर्षे, विधी तीन वर्षे, एकात्मिक चार वर्षे, बीएड द्विवर्षीय सामान्य व विशेष, एमपीएड द्विवर्षीय पदव्युत्तर अशा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या दोनच झाल्या होत्या.
कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियांना आलेली कासवगती दूर करण्यासाठी आणि कमी कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यासाठी सीईटी सेलने या पद्धतीने नियोजन
केले आहे.