प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:54 AM2021-05-27T08:54:52+5:302021-05-27T08:55:32+5:30

Education News: पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत.

Time to work hard on professors, demand to start recruitment immediately | प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

प्राध्यापकांवर बिगारी काम करण्याची वेळ, भरती तातडीने सुरू करण्याची मागणी

Next

- चंद्रकांत दडस

मुंबई : उच्च शिक्षित झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे ठरवून अनेकांनी नेट, सेट परीक्षा दिली. त्यानंतर संबंधित शाखांमधील पीएच.डी.ही संपादित केली. आता या पदवीमुळे तरी नोकरी नक्की लागेल या आशेवर असणाऱ्यांच्या अपेक्षा वास्तवात मात्र मातीमोल ठरल्या आहेत. पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या पदव्या आमच्या काय कामाच्या, असा उद्विग्न सवाल पीएच.डी.प्राप्त नेट, सेटधारकांनी केला आहे.

पीएच.डी. पदवी प्राप्त डॉ. अशोक उके औरंगाबाद येथील महाविद्यालयात सुरुवातीला तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम करीत होते. मात्र वर्षाकाठी मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या मानधनामुळे ते सध्या मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करीत आहेत. प्राध्यापक म्हणून काम करीत होतो, त्यापेक्षा थोडे अधिक पैसे बिगारी म्हणून काम करताना शिल्लक राहतात, असेही उके यांनी सांगितले. 

कोल्हापुरातील गारगोटी तालुक्यातील एमलीब, नेट, सेट तसेच व्यवस्थापन पदविकेचे शिक्षण घेतलेल्या शैलेश देसाई यांनी अनेक वर्षे सीएचबी म्हणून तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये काम केले. मात्र हातात महिन्याकाठी केवळ ८ ते १० हजार रुपये येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून ते फरशी फिटिंगचे काम करीत आहेत. 

पीएच.डी. पदवी घेतलेल्या बीड येथील डॉ. अशोक सारंगकर यांनीही नोकरी मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला असून, डॉ. भारतभूषण पंडित हे घरपोच आंबेविक्री करीत आहेत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक प्राध्यपकांनी हाच मार्ग सध्या अनुसरला असून, त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ प्राध्यापक भरती उठवून उच्चशिक्षित तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

प्राध्यापक भरती सुरू करण्यासंदर्भात अद्याप आदेश आलेले नाहीत. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यपकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव अद्याप आला नसून, आदेश आल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाईल.
- डॉ. धनराज माने, 
संचालक, उच्च शिक्षण

कोरोनाच्या काळामध्ये शासनाने नियमित प्राध्यापकांचे वेतन दरमहा अदा केलेले आहे; परंतु त्यांच्याप्रमाणेच काम करणारे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मात्र मानधनापासून वंचित आहेत.  राज्य सरकारने प्राध्यापक भरती तत्काळ सुरू करावी.
- डॉ. किशोर खिलारे, राज्य समन्वयक, प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन

Web Title: Time to work hard on professors, demand to start recruitment immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.