पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:14 PM2024-03-28T13:14:37+5:302024-03-28T13:14:46+5:30

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे.

Twice examination of three subjects of 5th-8th, only successful students are admitted to the next class | पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश

पाचवी-आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश

मुंबई : पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांच्या केंद्रीय स्तरावरील संकलित मूल्यमापन आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे. त्यातच यंदापासून या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षाही होणार आहे. वार्षिक परीक्षा होणार असल्याने पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचे महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

एकत्रित निकाल
संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित विषयाची होणार आहे. पाचवी-आठवीकरिता मात्र शाळांना प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या विषयांकरिता इतर विषयांप्रमाणे स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून एकत्रित निकाल तयार करायचा आहे. त्याच्या नमुना प्रश्नपत्रिका एससीईआरटीने दिलेल्या आहेत.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा
निकालपत्र तयार करताना द्वितीय सत्राचेच संकलित गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. उत्तीर्णतेच्या नवीन निकषानुसार शाळांना निकाल तयार करायचा आहे. निकाल पत्रकामध्ये गुण दिले जाणार असल्याने श्रेणी लिहिण्याची आवश्यकता नाही. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावयाची आहे. अनुत्तीर्ण झाल्यास तो त्याच इयत्तेत राहील, असे स्पष्टीकरण एससीईआरटीने महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाला दिले आहे.
 

Web Title: Twice examination of three subjects of 5th-8th, only successful students are admitted to the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा