३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता
By सीमा महांगडे | Published: September 17, 2022 08:24 PM2022-09-17T20:24:05+5:302022-09-17T20:24:53+5:30
एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या एकूण २३ अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश १८ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ दरम्यान पार पडणार आहेत.
एमए मानसशास्त्र हा अत्यंत महत्वाचा अभ्यासक्रम असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असतात. सामाजिक मानसशास्त्र या विषयात एमए मानसशास्त्र सुरु होत आहे. प्रवेश घेण्यासाठी तृतीय वर्ष बीएमध्ये किमान ३ पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आयडॉलने यासाठी कॉम्पुटर लॅबचीही व्यवस्था केली आहे.
याचबरोबर पत्रकारिता व जनसंपर्क ही महत्वाची क्षेत्रे असून अनेक नोकरी करणाऱ्यांना पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रामध्ये दूरस्थ माध्यमातून पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठात उपलब्ध नव्हती. यामुळे इच्छा असूनही अनेकांना हा अभ्यासक्रम नियमित माध्यमातून करता येत नव्हता. त्या सर्वांसाठी मुंबई विद्यापीठाने एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि एमए जनसंपर्क हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. पत्रकारिता व जनसंपर्क या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.
हे तीनही अभ्यासक्रम सत्र पद्धतीनेच घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच या अभ्यासक्रमांसाठी आयडॉलमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. या तीनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.