पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:27 AM2024-11-29T05:27:23+5:302024-11-29T07:41:48+5:30
क्षमतेनुसार निवडता येणार अभ्यासक्रम, विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात.
नवी दिल्ली - देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी-जास्त करण्याचा पर्याय देणार आहेत. यासाठी जलद पदवी कार्यक्रम (एडीपी) आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (ईडीपी) राबवण्याची परवानगी या आठवड्यात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली.
विद्यार्थ्याने एडीपी व ईडीपी यापैकी कोणत्या स्वरुपाचे शिक्षण घेतले त्याचा उल्लेख पदवी प्रमाणपत्रावर करण्यात येणार आहे. यासोबतच ही पदवी पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मानक कालावधीच्या पदवीच्या बरोबरीने ग्राह्य धरली जाणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील मसुदा भागधारकांच्या अभिप्रायासाठी लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात.
काय आहे योजना?
एडीपी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात (सेमिस्टर) अतिरिक्त क्रेडिट्स मिळवून तीन किंवा चार वर्षांच्या कमी कालावधीत पदवी पूर्ण करण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय ईडीपी अंतर्गत प्रत्येक सत्रात कमी क्रेडिट घेऊन अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. एडीपी व ईडीपी यापैकी कोणत्याही स्वरुपाचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना मानक कालावधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच एकूण क्रेडिट्स मिळणार आहेत.