IIT-IIM नव्हे, 'या' विद्यापीठातून शिकलेल्या विद्यार्थ्याला मिळालं १.१३ कोटींचं खणखणीत पॅकेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:11 PM2023-11-15T15:11:09+5:302023-11-15T15:11:33+5:30
मध्य प्रदेशच्या इंदौर येथे देवी अहिल्या विश्वविद्यालयाचा (DAVV) विद्यार्थी साहिल अली यानं नेदरलँड स्थित टेक्नोलॉजी फर्म एडियन कंपनीत १.१३ कोटींचं पॅकेज
नवी दिल्ली-
मध्य प्रदेशच्या इंदौर येथे देवी अहिल्या विश्वविद्यालयाचा (DAVV) विद्यार्थी साहिल अली यानं नेदरलँड स्थित टेक्नोलॉजी फर्म एडियन कंपनीत १.१३ कोटींचं पॅकेज प्राप्त करत विद्यापीठाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आयआयटी आणि आयआयएम प्लेसमेंटचेही रेकॉर्ड ब्रेक करत साहिलनं एक नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. साहिल यानं अहिल्या विश्वविद्यालयातून एमटेकची डिग्री पूर्ण केली आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये एडियनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी नोकरी मिळवली आहे.
अहिल्या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला इतकं मोठं पॅकेज मिळवणारा साहिल पहिला विद्यार्थी ठरला आहे. डोळ्यासमोर एक लक्ष्य ठेवून तयारी केल्याचं साहिल सांगतो. डीएव्हीव्हीच्या इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजमध्ये (आयआयपीएस) शिक्षण पूर्ण करुन साहिलनं आपलं करिअर केलं. विशेष म्हणजे साहिल हुशार तर आहेच, पण तंत्रज्ञानाशी संबंधित विषय शिकण्यात तो नेहमीच पुढे असायचा. एडियन येथे साहिलला सॉफ्टवेअर इंजिनिर पद मिळण्याआधीच त्यानं इटबर्प डेव्हलपर्स, कोडेन्सियस, क्लिफ.एआय, ग्रीनडेक, पायथन सॉफ्टवेअर फाऊंडेशन, गिटहब आणि क्रेड सारख्या प्रमुख संस्थांमध्ये इंटर्नशीप करुन अनुभव प्राप्त केला आहे. या अनुभवातूनच वेगवेगळ्या डोमेनवर काम करण्याचा हातखंडा साहिलकडे आहे.
साहिल आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना देतो. प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी साहिलनं प्रचंड तयारी केली होती. सध्या देशात आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेजेस मिळत असल्याच्या बातम्या येतच असतात. पण एका गैर-आयआयटी संस्थेतून उत्तीर्ण होऊन कोट्यवधींचं पॅकेज प्राप्त करणारा साहिल सर्वांपेक्षा वेगळा ठरतो.