गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:34 PM2024-04-18T21:34:24+5:302024-04-18T21:36:00+5:30
UPSC परीक्षा पास करणाऱ्या 1016 पैकी शेवटचा उमेदवार. तिसऱ्या प्रयत्नात महेश कुमार यांनी मिळवले यश.
UPSC CSE Result List : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच परीक्षा उत्तीर्ण होतात. मंगळवारी(16 एप्रिल) UPSC CSE 2023 चा निकाल जाहीर झाला. यंदा एकूण 1016 उमेदवार पास झाले. दरम्यान, युपीएससीचा निकाल लागल्यानंतर सर्वजण टॉपर्सची चर्चा करतात, पण यादीत सर्वात शेवटी असलेल्या उमेदवाराची चर्चा होत नाही. आज आम्ही तुम्हाला या यादीतील शेवटचा उमेदवार महेश कुमार यांच्याबद्दल सांगणार आहोत.
मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी असलेले महेश कुमार यांनी यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिला, म्हणजेच 1016 वा क्रमांक मिळवलेला. विशेष बाब म्हणजे, महेश कुमार सध्या शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात आणि नोकरी करत त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करत 42 व्या वर्षी हे यश मिळवले आहे. महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या कुटुंबात आणि सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महेश कुमार यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.
11 वर्षांनी 12 वी पास केली
महेश कुमार 1995 साली दहावी पास झाले, त्यावेळी ते शाळेत पहिले आले होते. पण घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण, शिक्षणाची आवड असलेल्या महेश यांनी 11 वर्षांनंतर, म्हणजेच 2008 साली 12 वीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. यानंतर 2011 साली त्यांनी पदवी घेतली आणि 2013 साली टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होऊन कंत्राटी शिक्षक बनले. यानंतर 2018 साली त्यांनी कोर्टाची परीक्षा देऊन क्लर्क म्हणून काम सुरू केले.
यानंतर 2023 मध्ये बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. नोकरी करत असताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. दिवसभर शिक्षकाची नोकरी आणि रात्री अभ्यास, असा महेश यांचा दीनक्रम होता. यूपीएससीच्या पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले, पण ते खचले नाहीत. अभ्यास कायम ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या 42 व्या वर्षी यश संपादन केले. त्यांचा यूपीएससीच्या यादीत शेवटचा क्रमांक असला तरी ते आता ते समाजात क्लास वन अधिकारी म्हणून वावरणार आहेत.