IAS, IPS होण्याची सुवर्णसंधी; UPSC ने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या संपूर्ण तपशील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:16 IST2025-01-22T15:15:00+5:302025-01-22T15:16:04+5:30
UPSC CSE 2025 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे.

IAS, IPS होण्याची सुवर्णसंधी; UPSC ने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या संपूर्ण तपशील...
UPSC CSE 2025 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज(22 जानेवारी) नागरी सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. यंदा एकूण 979 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यावेळी पदांची संख्या गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी, या कालावधीत UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS), भारतीय वन सेवा (IFS), भारतीय परराष्ट्र सेवा(IFS) आणि इतर प्रतिष्ठित सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
यापूर्वी जास्त जागा भरल्या
दरम्यान, 2024 मध्ये UPSC ने 1,105 जागा भरल्या होत्या, तर 2023 मध्ये 1105 आणि 2022 मध्ये 1011 पदे भरण्यात आली होती. यंदा 979 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांपैकी 38 पदे अपंग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, UPSC CSE 2025 ची प्राथमिक परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. पात्र उमेदार आजपासून 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
पात्रता निकष: कोण अर्ज करू शकतो?
UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्षे असावे, तर 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1993 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा.
अर्ज फी
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, महिला उमेदवार, SC/ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्याची गरज नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवार 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणादेखील करू शकतात.
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या OTR टॅबवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.