UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 02:54 PM2024-04-16T14:54:35+5:302024-04-16T14:55:10+5:30
UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे.
UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2023 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत सर्वसाधारण श्रेणीतून 347, EWS श्रेणीतून 115, OBC प्रवर्गातून 303, SC प्रवर्गातून 165 आणि ST प्रवर्गातून 86 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आहे. तसेच, यंदा एकूण 1016 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यासह केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि विभागांमधील एकूण 1105 रिक्त जागा भरण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी 28 मे रोजी प्री, तर 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान मेन्स परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला.
कोण आहेत टॉप-3 उमेदवार
मेन्स परीक्षा पास केलेल्या उमेदवारांची 2 जानेवारी ते 16 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि 18 मार्च ते 9 एप्रिल, या कालावधीत मुलाखत घेण्यात आली. आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य श्रीवास्तव CSE 2023 मध्ये (AIR 1) देशात पहिला झाला आहे. यानंतर अनिमेश प्रधानने द्वितीय क्रमांक (AIR 2) तर, डोनुरु अनन्या रेड्डीने तृतीय क्रमांक (AIR 3) मिळवला आहे. या परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या सर्व उमेदवारांची यादी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल.