ॲडमिशन घ्यायचीय? कागदपत्रे तयार ठेवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 01:40 PM2023-06-05T13:40:23+5:302023-06-05T13:41:22+5:30
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
- श्रीकांत जाधव
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. आता पुढील प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावाधाव सुरू होईल. कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असला, तरी काही मूळ कागदपत्रे लागतातच. त्यासाठी काय तयारी करायला हवी, कोणती कागदपत्रे गरजेची आहेत, त्याचा हा आढावा...
आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- दहावी आणि बारावीची मूळ गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- चारित्र्याचे प्रमाणपत्र
- निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड किंवा वीजबिल
- डोमिसाइल प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो.
वय/डोमिसाइल/राष्ट्रीयत्व दाखला कोठे मिळणार ?
इंजिनीअरिंग, मेडिकल अभ्यासक्रमासाठी अधिवासाचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्हा तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. जन्म महाराष्ट्रात असेल त्यांना डोमिसाइलसाठी सूट आहे, तरीही महाराष्ट्र अधिवास, तसेच राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे योग्य असते. हे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून मिळवता येते.
उत्पन्नाचा दाखला / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
प्रवेश अर्ज किंवा शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सिद्ध करणारे पुरावे यासाठी लागतात. तसेच क्रिमिलेअर / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / आमदारांकडून मिळणारे ओळख प्रमाणपत्र आवश्यक असते.
जात प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र
राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र लागते. तसेच जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. वर्षभर जातीचे दाखले दिले जातात. मात्र, निकालापूर्वी म्हणजे एप्रिल / मे महिन्यात अर्जांची गर्दी होते. तेव्हा वेळीच प्रमाणपत्र काढून घ्यावे. जातीचे प्रमाणपत्र जलद गतीने देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्र आहेत. महा ई-सेवा केंद्र / आपले सरकार येथे अर्ज करावा लागतो.
त्यानंतर विभागीय जात पडताळणी समित्यांकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. यासाठी जातीचे मूळ प्रमाणपत्र, प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आजोबा/मोठे काका/मोठ्या आत्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे शपथपत्र अशी कागदपत्रे जोडावी लागतात. जात पडताळणीसाठी उमेदवार गेल्यावर त्याची मुलाखत घेतली जाते. यावेळी कागदपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्न विचारले जातात.
अर्ज कोठे कोठे करता येतो ?
- जिल्हा तहसील कार्यालय मुंबई शहरासाठी ओल्ड कस्टम, शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई उपनगरासाठी अंधेरी, बोरिवली, कुर्ला तहसील आहे.
- तसेच सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार संकेतस्थळावर अर्ज करू शकता.